वय झालं म्हणून काय झालं? वय झालेली माणसं तरुणांना संधीही देतात
कर्जत जामखेड दि.23 जानेवारी 2024
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आणि शरद पवारांचे नातू आमदार रोहित पवार यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले असून त्यांना उद्या, बुधवारी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
Baramati Agro कंपनीच्या साखर कारखाना खरेदी व्यवहार प्रकरणी रोहित पवार ईडीच्या रडार आहेत. यासंदर्भात त्यांनी ट्वीट करत, यापूर्वी जसे सहकार्य केले तसेच आताही अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचे म्हटले आहे.
भाजपाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी कन्नड सहकारी साखर कारखान्यासंदर्भात ईडीकडे तक्रार दाखल केली होती. राज्य सहाकारी बँकेच्या लिलावामध्ये हेरफेर करत Baramati Agroने हा साखर कारखाना 50 कोटी रुपयांना विकत घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या Baramati Agro ही कंपनी आमदार रोहित पवार यांची आहे. जवळपास 15 दिवसांपूर्वीच ईडीने Baramati Agro या कंपनीसह सहा ठिकाणी ईडीने छापेमारी केली होती. त्यानंतर आता आमदार रोहित पवार यांना समन्स बजावून 24 जानेवारी रोजी हजर राहण्यास सांगितले आहे.
त्याबद्दल रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ईडी कार्यालयात उद्या, बुधवारी चौकशीसाठी गेल्यानंतर अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करणार आहे. मात्र सध्याचे सूडाचे राजकारण बघता, ईडीने काही चुकीची कारवाई केली तर, कुणीही घाबरून जाऊ नये, उलट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत तसेच महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणाऱ्या आणि संविधानावर विश्वास असलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत सर्वांनी एकजुटीने उभे रहावे. कारण आपल्याला कुणापुढेही न झुकता महाराष्ट्राचा स्वाभिमानी बाणा टिकवायचाय आणि महाराष्ट्र धर्म जपायचा आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
माझ्या कुटुंबासाठी आणि कोवळ्या वयातील मुलांसाठी तर हे घाणेरडे राजकारण न समजण्याच्या पलीकडचे आहे. पण तरीही सर्वजण खंबीरपणे माझ्यासोबत आहेत. शिवाय, बुधवारी माझ्यासोबत खासदार सुप्रिया सुळे आणि स्वतः शरद पवार हेही येत आहेत, असे सांगतानाच, वय झाले म्हणून काय झाले? वय झालेली माणसे तरुणांना संधीही देतात आणि प्रसंगी बाप माणूस म्हणून ढाल बनून उभीही राहतात. माझ्यासाठी तर हे भारावणारे आहे. या वयातही महाराष्ट्राचा हा सह्याद्री कणखरपणे पाठीशी उभा राहत असेल तर आणखी काय हवे आहे, असे सांगत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला