तनपुरे व कर्डिले यांच्यात श्रेय वादावरून पुन्हा जुंपली
राहुरी दि.15 जानेवारी 2024
भाजप खासदार सुजय विखे आणि माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे (शरद पवार गट) यांनी समाज माध्यमांवर पोस्ट लिहित खणखणीत उत्तर दिले आहे.
माजी झाले, तरी वर टोपी करून फुकट नारळ फोडण्याची हौस जात नाही,” अशी टीका आमदार तनपुरे यांनी केली आहे. नगर-मनमाड महामार्गावरील मुळा डॅम फाटा रस्त्याच्या डांबरीकरणाच्या प्रारंभावरून या आरोपांच्या फैरी झडत आहेत.
गेल्या आठवड्यात मुळा डॅम फाटा ते मुळानगर या रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया लवकर पूर्ण करून कामास सुरूवात करावी, यासाठी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. या रस्त्याच्या डांबरीकरणाचा खासदार विखे आणि माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या उपस्थित प्रारंभ झाला. यावेळी विखे आणि कर्डिले या दोघांनी आमदार तनपुरे यांच्यावर जोरदार टीका केली.
“राज्यातील सरकारने या रस्त्याचे काम मार्गी लावले आहे. या रस्त्याचे काम सुरू होणार आहे हे, माहित असल्याने केवळ श्रेय मिळावे म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधींनी रास्ता रोको आंदोलनाचा फार्स केला. रास्ता रोको आंदोलनामुळे कुठे कामे मार्गी लागतात काय? त्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा लागतो”, असे खासदार विखे यांनी म्हटले आहे.
‘थांबतो.. माफ करा.., अशा त्यांच्या पोस्टवर टीका करताना कर्डिले यांनी यापद्धतीने लोकप्रतिनिधींचा सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे. मात्र लोकांनीच आता तुम्हाला थांबवण्याचा निर्णय घेतल्यामुळे तेच आता तुम्हाला थांबवणार आहेत’, अशी टोलेबाजी केली.
आमदार तनपुरे यांनी या टीकेवर लगेचच समाज माध्यमावर पोस्ट शेअर करत प्रत्युत्तर दिले आहे. ‘यालाच म्हणतात, आयत्या पिठावर रेघा ओढणे. या रस्त्याची प्रशासकीय मान्यता महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाली. एक एप्रिल 2022 तुमच्या सरकारने निविदा काढायला वर्ष लावले. विधानसभेत मी लक्षवेधी लावल्यावर निविदा काढण्यात आली.
मर्जीतल्या ठेकेदाराला काम मिळाले नाही म्हणून तुम्ही ठेकेदारावर दबाव आणून त्याला काम चालू करू दिले नाही. नगर-मनमाड महामार्गावर रस्ता रोको करावा लागला आणि वर टोपी करत उद्घाटन करत आहात. ज्यांच्यामुळे काम सुरू व्हायला तब्बल दीड वर्ष उशिर लागला असे उद्घाटन वीर छायाचित्रात दिसतायेत. काहींना माजी झाले तरी फुकट नारळ फोडण्याची हौस जात नाही’, अशी टीका आमदार तनपुरे यांनी पोस्ट शेअर करत केली आहे.