सामाजिक कार्यकर्त्या मीरा शिंदे यांच्या प्राणांतिक उपोषणाला यश
श्रीगोंदा दि 2 नोव्हेंबर 2023
श्रीगोंदा प्रतिनिधी- श्रीगोंदा नगरपरिषद हद्दीत बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेली सर्व अनधिकृत होर्डींग तातडीने काढण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्या मीरा शिंदे यांचे दोन दिवसीय प्राणांतिक उपोषण तहसिलदार हेमंत ढोकले, मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर, उपनगराध्यक्षा ज्योती खेडकर यांच्या हस्ते सोडविण्यात आले.
शहरातील लावण्यात आलेले सर्व अनधिकृत होर्डिंग्ज काढून संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करावेत तसेच काढलेले होर्डिंग्ज पुन्हा त्याच जागी लागणार नाहीत याची हमी नगरपरिषदेकडून मिळेपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार अशी भूमिका शिंदे यांनी घेतल्यामुळे मुख्याधिकारी ढोरजकर यांना होर्डिंग्ज काढण्याची मोहीम पोलीस बंदोबस्तात सुरु करावी लागली. शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकातील अनधिकृत होर्डिंग्ज काढल्यानंतर सर्व अनधिकृत होर्डिंग्ज वरील कार्यवाही पुढील १० दिवसांत पूर्ण करण्यात येईल तसेच नगरपरिषदेने कार्यवाही दरम्यान काढून घेतलेले किंवा स्वतः होर्डिंग्ज धारकांनी स्वतःहून काढलेले होर्डिंग्ज पुन्हा अनधिकृतपणे उभारल्यास शासकीय नियमाप्रमाणे गुन्हे दाखल करणार असल्याचे ढोरजकर यांनी सांगितले. त्यामुळे अनधिकृत होर्डिंग्ज धारकांनी आंदोलनाचा धसका घेत स्वतः होर्डिंग्ज काढून घेण्यास सुरुवात केल्यामुळे या उपोषणाची तालुक्यात चर्चा होती.
मोहीम थांबणार नाही….
याबाबत मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर म्हणाले, बेकायदा लावलेले 46 होल्डिंग काढल्याशिवाय मोहीम थांबणार नाही होल्डिंग हटाव मोहीम आठ दिवसात पूर्ण करणार आहोत यापुढे बेकायदा होल्डिंग लावणारांवर गुन्हे दाखल केले जातील.