साखर कारखानदारीत आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर : विवेक कोल्हे
कोपरगाव:दि.16 जुलै 2024
बदलत्या मुक्त अर्थव्यवस्थेत साखर कारखानदारीत आमूलाग्र बदल होत आहेत. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने हे बदल आत्मसात केले. महिंद्रा अॅण्ड महिंद्रा या कंपनीशी करार करून उपग्रह आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) प्रभावी वापर करणारा या सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना देशातील पहिला साखर कारखाना ठरला असल्याची माहिती अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी दिली.
कोल्हे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, या कारखान्यांत प्रचलित पद्धतीनुसार साखर उतारा तपासून त्यानंतरच ऊसतोडणीचा कार्यक्रम राबविण्यासाठी बराच वेळ जात असे. उपग्रहाद्वारे उसाच्या प्लॉटचे मापन, मल्टीस्पेक्ट्रम कॅमेऱ्याच्या साहाय्याने ऊस पिकातील हरितद्रव्य पृथक्करण करून शेतात उभ्या असलेल्या उसाची साखर उतारा तपासणी केली जाते. कारखान्याचे कार्यकारी . संचालक बाजीराव सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, केन मॅनेजर जी. बी. शिंदे, ऊस विकास
अधिकारी शिवाजीराव देवकर, महिंद्रा कंपनीचे करमयोग सिंग, मंदार गडगे, सुमित दरफले, किरण किर्दक यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी प्राधान्याने अंमलबजावणी करीत आहे.
कागजविरहित काम
या तंत्रज्ञानात वेळोवेळी सुधारणा करून सर्व मार्गदर्शकांच्या मदतीने टप्प्याटप्प्याने वाढ करत मागील वर्षापेक्षा साखर उताऱ्यात ०.२ टक्क्यांची समाधानकारक वाढ मिळाली आहे. २०२३-२४ या गळीत हंगामात ७ लाख ९ हजार ११२ मे. टन उसाचे गाळप करत १०.५९ टक्के साखर उतारा मिळविला आहे. पूर्णपणे कागदविरहित कामकाज करणारा देशातील पहिला कारखाना म्हणून सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याची ओळख निर्माण झाली असल्याचे विवेक कोल्हे म्हणाले.