जालना दि.14 ऑक्टोबर 2023
राज्य सरकारला फक्त दहा दिवसांचा अल्टिमेटम
मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रातलं राजकारण तापलं आहे. ४० दिवसांत मराठ्यांना टिकणारं आरक्षण देऊ, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं. या आश्वासनानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं होतं. यानंतर आता मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं शस्त्र उगारलं आहे.
अंतरवाली सराटी येथील जाहीरसभेतून जरांगे यांनी तीव्र उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे.यावेळी मनोज जरांगे म्हणाले, दहा दिवसांच्या आत मराठ्यांना आरक्षण द्या. अन्यथा पुढची जबाबदारी सरकारची असेल मराठा समाजाची नसेल. २२ ऑक्टोबरला आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाईल.
पत्रकार परिषद घेऊन मराठा समाजाला पुढचं आंदोलन कसं असेल ? याची दिशा सांगितली जाईल. मी माझ्या मराठा समाजाच्या शब्दाच्या पुढे जात नाही, मरेपर्यंत जाणार नाही. मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय तुमचा हा मुलगा एक इंचही मागे हटणार नाही. फक्त सगळ्यांनी शांततेत आंदोलन करायचं. मग सरकार आरक्षण कसं देत नाही, हे मराठे बघतील. याची काळजी करू नका.
मी पुन्हा एकदा शब्द देतो, २९ ऑगस्टला मी तुम्हाला शब्द दिला होता. आमरण उपोषण करून एकतर माझी अंतयात्रा निघेल किंवा मराठ्याच्या आरक्षणाची विजययात्रा निघेल. हेच मी पुन्हा एकदा जाहीर करतो. आता माघार घेतली जाणार नाही. २३ ऑक्टोबरच्या आत मराठ्यांना आरक्षण दिलं नाही, तर मी एवढं टोकाचं उपोषण करणार की यामुळे एकतर माझी अंतयात्रा निघणार किंवा मराठ्यांच्या आरक्षणाची विजयीयात्रा निघणार. पुढची दिशा २२ ऑक्टोबरलाच सांगितली जाईल. मराठा समाजाने सज्ज व्हावं.
मराठ्यांच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय आता माघार नाही. हे आंदोलन शांततेत होणार पण मराठे मागे हटणार नाहीत, असंही मनोज जरांगे म्हणाले.