नागवडेंना 110 कोटी, घुलेंना 150 कोटी, कोल्हेंना 125 कोटी, अगस्तीला 100 कोटी तर वृद्धेश्वरला 99 कोटी
श्रीगोंदा, विशेष प्रतिनिधी दि.19 मार्च 2024
लोकसभा निवडणुकीत ऊस उत्पादक शेतकरी आणि स्वपक्षीय साखरसम्राट आमदारांच्या नाराजीचा फटका बसू नये, यासाठी महायुती आघाडी सरकारने भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या 13 साखर कारखान्यांना 1898 कोटींचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यात अहिल्यानगरमधील पाच साखर कारखान्यांचा समावेश आहे.
भाजपचे 5, राष्ट्रवादीचे 7 आणि 1 कारखाना काँग्रेस आमदारांशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. भोर-वेल्हा मतदार संघाचे काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांना खूश करण्यासाठी त्यांच्या राजगड साखर कारखान्यास 80 कोटी रुपयांची कर्जहमी देण्यात आली आहे. आचारसंहितेआधी मंत्रिमंडळ उपसमितीकडून कर्जहमीच्या या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. राज्य सरकार स्वत:च्या जबाबदारीवर राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून हे कर्ज घेऊन ते कारखान्यांना देणार असून त्याबाबतच्या प्रस्तावास दोनच दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ उपसमितीने मान्यता दिली. महत्त्वाचं म्हणजे आचारसंहिता लागू होण्याच्या आधी मंत्रीमंडळ उपसमितीने या प्रस्तावाला मान्यता दिल्याचं समोर आलं आहे.
अजित पवार गटाशी संबंधीत लोकनेते मारोतराव घुले पाटील ज्ञानेश्वर कारखाना – 150 कोटी, अगस्ती कारखान्याला 100 कोटी, शिवाजीराव नागवडे कारखान्याला 110 कोटी तर भाजपशी संबंधीत वृद्धेश्वर कारखान्याला 99 कोटी व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे – 125 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे. याखेरीज राज्यातील इतर सहा साखर कारखान्यांचाही त्यात समावेश आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांना खूश करण्यासाठी त्यांच्या राजगड साखर कारखान्यास (भोर) 80 कोटी रुपयांची कर्जहमी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटातील काही आमदारांच्या कारखान्यांना ही मदत नाकारण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.