संजय राऊत जिथे प्रचाराला जातात तिथे अपयश येतंच, लंकेंच्या जनसंवाद यात्रेला आल्यास नगरचा निकाल आजच लागणार ; भाजपची टीका
निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून नगर दक्षिण लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.
त्यामुळे अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके (Sujay Vikhe Patil vs Nilesh Lanke) असा सामना रंगणार हे निश्चित झाले आहे. आजपासून निलेश लंके लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत.
महाविकास आघाडीचे नगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार निलेश लंके हे आज पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी गडावरून आपल्या प्रचाराचा शुभारंभ करत आहेत. ते लोकसभा मतदारसंघात स्वाभिमान जनसंवाद यात्रा सुरू करत आहेत. 1 एप्रिल ते 16 एप्रिल दरम्यान ही यात्रा असणार आहे. या यात्रेच्या शुभारंभाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात , राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी अंकुश काकडे यांची उपस्थिती असणार आहे. मात्र संजय राऊतांच्या उपस्थितीवरून भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांनी जोरदार टीका केली आहे.
तर अहमदनगर दक्षिणचा निकाल आजच लागला
शिवाजी कर्डिले म्हणाले की, निलेश लंके हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उभे राहिले आहेत. त्यामुळे नेत्यांच्या त्यांच्या प्रचाराला यावे लागणार आहे. परंतु संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंचे शिवसेनेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. संजय राऊत ज्या ठिकाणी जातात त्याठिकाणच्या उमेदवाराला 100 टक्के अपयश येते. ते जर आज निलेश लंके यांच्या जनसंवाद यात्रेला येणार असतील तर अहमदनगर दक्षिणचा निकाल आजच लागला असं समजावं, अशी टीका त्यांनी संजय राऊतांवर केली आहे.