मुंबई येथे होणार नागवडेंचा “उबाठा” गटात पक्षप्रवेश
श्रीगोंदा दि.22 ऑक्टोबर 2024
दोन दिवसांपूर्वी कार्यकर्ता मेळावा घेऊन अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे हे हाती मशाल घेणार हे निश्चित झाले होते. त्यावर आज शिक्कामोर्तब झाले असून नागवडे यांचा शिवसेना ठाकरे गटातील प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. उद्या दि. २३ बुधवार रोजी दुपारी दोन वाजता मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न होणार आहे या प्रवेशा सोबतच अनुराधा नागवडे यांची ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर होणार आहे या प्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने नागवडे मोठं शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत.
उद्याच्या प्रवेशा बाबत नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांना विचारले असता महाविकास आघाडीच्या वतीने विधानसभा निवडणूक लढविण्याची लोकभावना आणि कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याने जिल्हा सहकारी बँक संचालिका सौ. अनुराधा राजेंद्र नागवडे या महाविकास आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाच्या वतीने निवडणूक लढविणार असून उद्या बुधवार दि.२३ ऑक्टोंबर रोजी दुपारी २ वाजता माझ्यासह पत्नी अनुराधा नागवडे आम्ही शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबईत मातोश्री येथे उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश करणार आहोत. उद्या मुंबईत होणाऱ्या या प्रवेश सोहळ्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करतानाच राजेंद्र नागवडे पुढे म्हणाले की, मतदार संघातील प्रलंबित विकास कामे, लोकांची शासकीय कार्यालयात होणारी अडवणूक, तालुक्यात वर्षानुवर्षे प्रलंबीत असलेले प्रश्न, घोड-कुकडीच्या पाण्याबाबत तालुक्यातील शेतकऱ्यांवर होणारा अन्याय या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी नागवडे कुटुंबातील सदस्याने विधानसभा निवडणूक लढवावी असा सामान्य लोकांचा आग्रह होता ही जनभावना लक्षात घेऊन सौ. अनुराधा नागवडे या निवडणूक लढवणार आहेत.
विधानसभा निवडणूक लढवण्याचा हा निर्णय मागील ३ वर्षापासून नागवडे कुटुंबाने घेतला होता त्या दृष्टीने आम्ही सर्व तयारी केली होती दोन दिवसापूर्वी वांगदरी येथे घेतलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने निवडणूक लढवण्याचा सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह होता त्यांच्या भावना विचारात घेऊन नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष जेष्ठ नेते बाबासाहेब भोस, शिवसेना उपनेते साजन पाचपुते, दिपकशेठ नागवडे यांच्याशी चर्चा करून शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.अशी माहिती राजेंद्र नागवडे यांनी दिली.
बुधवारी होणाऱ्या प्रवेश सोहळ्यास मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री राजेंद्र नागवडे व सौ अनुराधा नागवडे यांनी केले आहे