खा. विखे यांच्या वाढदिवसानिमित्त मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन
अहमदनगर दि.23 नोव्हेंबर 2023
अरणगाव ता. नगर येथे अरणगाव युवा प्रतिष्ठान आयोजित मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अहमदनगर दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटील यांनी झेंडा दाखवून या स्पर्धेचे उद्घाटन केले. प्रारंभी खासदार विखे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. तसेच खासदार सुजय विखे यांचा संयोजकांच्या वतीने सत्कार देखील संपन्न झाला.
खासदार सुजय विखे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अरणगाव युवा प्रतिष्ठान यांनी आयोजित केलेल्या या मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे ५ किमी खुलागट व ३ किमी ५ वी ते १० वीचे विद्यार्थी आणि पुरुष व महिला गट अशा विविध गटांमध्ये आयोजन करण्यात आले होते. अरणगाव ते वी.आय.आर.डी.इ. गेट असा या स्पर्धेचा मार्ग होता.
दरम्यान यावेळी बोलताना खासदार विखे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी खेळाकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले व आपल्या तालुक्याचे नावलौकिक करावे. यासोबतच खेळाकडे लक्ष केंद्रित करत असताना अभ्यासाकडे मात्र दुर्लक्ष करू नये असा सल्ला देखील त्यांनी विद्यार्थ्यांनी दिला तसेच उपस्थित सर्वांशी संवाद साधला.
याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, नगर तालुका अध्यक्ष दिपक कारले, सुजित कोके, रमेश जंगली, विकास कार्ले, रमेश आजबे, ज्ञानदेव शेळके, संजय गिरवले, रावसाहेब शिंदे यांच्यासह समस्त ग्रामस्थ आणि स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.