इंदुरीकर महाराजांना ‘त्या’वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी कोर्टाकडून दिलासा…
अहमदनगर दि.8 नोव्हेंबर 2023
: इंदुरीकर महाराजांना ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी तात्पुरता दिलासा मिळाला आहे. याप्रकरणाची पुढची सुनावणी 21 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. यामुळे दिवाळीच्या काळात इंदुरीकर महाराजांना दिलासा मिळाला आहे.समन्स बजावूनदेखील इंदुरीकर महाराज आजच्या सुनावणीला अनुपस्थित होते. संगमनेर कनिष्ठ न्यायालयात याप्रकरणाची सुनावणी सुरू आहे. इंदुरीकर महाराजांच्या वतीने वकिलांनी जामीन अर्ज दाखल केला. त्यामुळे आता जामीन घेण्यासाठी इंदुरीकर महाराज न्यायालयात येणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
इंदुरीकर महाराजांनी 2020 साली एका किर्तनात अपत्यप्राप्तीबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. 2020 साली दाखल झालेल्या गुन्ह्यात जिल्हा न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. पण अंधश्रद्धा निर्मूलन समीती आणि राज्य सरकारने या निर्णयाला आव्हान देत हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टाने हा खटला जिल्हा न्यायालयात पुन्हा चालवण्याचा आदेश दिला होता. तोच आदेश सुप्रिम कोर्टानेही कायम ठेवल्याने इंदुरीकर महाराजां विरोधात संगमनेर कोर्टात हा खटला नव्याने सुरू झाला आहे. गेल्या महिन्यात कोर्टाने समन्स बजावले होते. मात्र इंदुरीकर महाराज भेटले नाही असा रिपोर्ट पोलिसांकडून कोर्टात सादर करण्यात आला होता. या प्रकरणाची आज पुन्हा सुनावणी झाली, पण आजही इंदुरीकर
महाराज सुनावणीसाठी हजर राहिले नाहीत.काय आहे ते वादग्रस्त वक्तव्य ?
एका कीर्तनात इंदुरीकर म्हणाले होते, “स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होत असतो. स्त्री संग जर विषम तिथीला झाला, तर मुलगी होत असते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होत असते. “याचा पुरावा विचाराल तर पुलश्य नावाच्या ऋषीनं कैकशी नावाच्या स्त्रीसोबत सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आले आणि आदिती नावाच्या ऋषीनं पवित्र दिवशी संग केला, त्याच्यापोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला. तर
हिरण्यकश्यपूनं नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला.” यानंतर इंदुरीकरांचं हे वक्तव्य म्हणजे गर्भलिंग निदान कायद्याचं उल्लंघन आहे, अशी टीका त्यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती.