कारभार लोकाभिमुख व्हावा : आ. पाचपुते
श्रीगोंदा : दि.३१ डिसेंबर २०२४
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचे व्हिजन ठरविण्यापूर्वी विरोधी पराभूत उमेदवार व प्रमुख नेत्यांना लवकरच निमंत्रित करणार आहे. त्यांच्या चांगल्या सूचना विचारात घेणार आहे. सामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी श्रीगोंद्यात जनता दरबार घेणार आहे, अशी माहिती आमदार विक्रम पाचपुते यांनी दिली.
श्रीगोंदा येथे पाचपुते यांनी पत्रकारांशी संवाद साधला. श्रीगोंदा शहरातील शासकीय जागांचा प्रश्न विचारात घेऊन गट १२३७ मध्ये एकत्रित प्रशासकीय इमारत, पाच एकर जागेवर क्रीडांगण, त्यासाठी आठ कोटी मंजूर केले आहेत. उप जिल्हा रुग्णालयास १४.५ कोटी मंजूर झाले आहेत. श्रीगोंदा शहरात चांगले सांस्कृतिक भवन, पंतनगरमधील कम्युनिटी हॉलचे आधुनिकीकरण करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.
सामान्य नागरिकांच्या अडकलेल्या कामांबाबत शासकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. त्याबाबत ते कार्यवाही करत आहेत. मात्र, जे सामान्य नागरिक अधिकाऱ्यांना थेट भेट देतात. त्याबाबत अधिकारी दिरंगाई करतात, अशा तक्रारी आहेत. अधिकाऱ्यांनी सामान्य नागरिकांची कामे प्राधान्याने करणे अपेक्षित आहे, असे पाचपुते यांनी सांगितले.
कुकडीचे आवर्तन श्रीगोंद्यास सहा दिवस मिळणार आहेत. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांची भरणी राहू नयेत, यासाठी अधिकाऱ्यांनी नियोजन करावे. लवकरच पाणी वापर संस्था प्रतिनिधी व अधिकाऱ्यांची एक बैठक घेणार आहे आणि समस्या जाणून घेणार आहे, असेही पाचपुते यांनी सांगितले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
ॲट्रॉसिटीला विरोध नाही…
ॲट्रॉसिटी कायदा हा दलित समाज बांधवांवर होणाऱ्या अन्यायास न्याय मिळवून देण्यासाठी चांगला कायदा आहे, या कायद्याला माझा विरोध नाही. मात्र, काही जण या कायद्याचा दुरुपयोग करतात. अशा दुरुपयोगाला माझा विरोध आहे. यावर विधानसभेतही बोलणार आहे. सामान्य दलित बांधव या कायद्याचा आधार घेत नाहीत. त्यांच्यावर तशी वेळही येत नाही. काही जणांवर एका वर्षात चार-पाच अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्याची वेळ का येते? याबाबत चिंतन होण्याची गरज आहे, असेही आमदार विक्रम पाचपुते यांनी म्हणाले.