_पालकांनो आपल्या मुलांवर लक्ष द्या; पोलीस निरीक्षकांचे भावनिक आवाहन_
नगर दि.16 डिसेंबर 2023
इंस्टाग्राम वरून अनोळखी मुलांशी ओळख..गप्पा गोष्टी प्रेम अनाभका.. मग काय? घरातून पलायन करत थेट परराज्य गाठले..कोतवाली पोलिसांनी शोधून आणले..त्यांना चूक समजली पण शेवटी उरलं काय? पश्चाताप अन् बदनामी!
कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली ही घटना मुलांना आणि पालकांना विचार करायला लावणारी आहे. त्याचे झाले असे,अठरा वर्षे पुर्ण झालेल्या दोन मुली सोशल मिडीयाच्या इंस्टाग्रामवर अनोळखी तरुणांशी ओळख करून घरातून निघून गेल्या. पालकांनी शोधाशोध केली मात्र उपयोग झाला नाही.त्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्यादी दिल्या. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनातून कोतवाली पोलिसांनी एका मुलीला बिहार आणि उत्तर प्रदेशच्या सीमारेषेवरून आणले आणि काही दिवस पाहुण्यांकडे अहमदनगर मध्ये आली आणि निघून गेलेल्या दुसऱ्या मुलीला मराठवाड्यातून आणले. सोशल मिडीयावर झालेले प्रेम,मैत्री हे मृगजळासारखे असते. दिखाव्याच्या खोट्या गोष्टींमध्ये गुंतवून मुलांकडून जाळ्यात फसवले जाते. अशा दिखाव्याला मुली बळी पडतात. घरातील आई वडील नातेवाईकांचा जराही विचार न करता कल्पना विश्वाच्या जगात हरवून जातात. मात्र यातून कुटुंबाला होणारा त्रास, बदनामी अटळ असते. जेंव्हा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले तेंव्हा त्यांना आपण खूप मोठी चूक केली असल्याचे समजले.तपास लावल्यानंतर मुलींच्या परिसरातील नागरिकांनी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस जवान विश्वास गाजरे,रवी टकले, प्रमोद लहारे, सचिन लोळगे यांचा सत्कार केला.
‘याबाबत पालकांनी आपल्या पाल्यांवर कायम लक्ष देणे गरजेचे आहे. प्रत्येक विषयाबाबत वेळोवेळी संवाद साधावेत. पालकांचे आपल्या पाल्याची मैत्रीपूर्ण संबंध असावेत. मुलांमध्ये फक्त भीती नको तर, आदरयुक्त भीती असावी. पालकांनी या गोष्टीकडे विशेष लक्ष देण्याचे भावनिक आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी व्यक्त केले.’
ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस जवान विश्वास गाजरे, रवी टकले, प्रमोद लहारे, सचिन लोळगे आदींनी केली आहे.
चौकट:
मग आयुष्याचा जोडीदार निवडताना का काळजी घेत नाही
‘सर्व शाळा-महाविद्यालयात मार्गदर्शन करताना चंद्रशेखर यादव एक आवर्जून उदाहरण सांगतात की,’आपण एक टिकलीचे पाकीट घ्यायचे असेल तर दहा ते बारा पाकीट चाळून पाहतो, चप्पल ड्रेस किंवा काहीही घ्यायचं म्हटलं तरी चार ते पाच दुकानात जाऊन पाहतो मग, आपण आयुष्याचा जोडीदार निवडताना किती काळजी घ्यायला पाहिजे? त्यामुळे मुलींनी अधिकची काळजी घ्यायला हवी’