लंकेंची कोंडी..? पारनेरमध्ये ठाकरे गटाने टाकला डाव
पारनेर दि.25 जुलै 2024
येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुका असून त्यानुषंगाने आता राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. विशेष म्हणजे अहमदनगर जिल्ह्यावर महाविकास आघाडीतील राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडून लक्ष देणे सुरु आहे.
यातच आता नगर जिल्ह्यातील शरद पवार गटाच्या निलेश लंके यांच्या पारनेरमध्ये शिवसैनिकांनी ( UBT) विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. यामुळे येणाऱ्या काळात पक्षाने संधी दिली तर आम्ही विधानसभा निवडणूक लढवणार अशी माहिती शिवसेना उबाठा पक्षाचे पारनेर तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे यांनी दिली.
लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आता येत्या काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होणार आहे. ऑक्टोबर महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. यातच पारनेर – नगर विधासभेसाठी शिवसेना उबाठा पक्षाकडून शिवसेना तालुकाप्रमुख डॉ श्रीकांत पठारे हे उमेदवारीसाठी रिंगणात उतरले आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी त्यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने महाराष्ट्रात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पक्षसंघटना बांधणी मजबूत करण्यासाठी व संपूर्ण ताकतीनिशी विधानसभा निवडणुकीत उतरण्याचे ठरविले असून त्यादृष्टीने संघटनात्मक बाबींवर भर दिला आहे. याचाच एक भाग म्हणून पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने पारनेर तालुक्यात भगवा सप्ताह व मशाल यात्रेचे आणि शिवसंवाद मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती पठारे यांनी दिली आहे.
भगवा सप्ताह ४ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट दरम्यान घेण्यात येणार आहे. पारनेर तालुक्याचा भौगोलिक विचार करुन तालुक्यातील सर्वच गावांमध्ये आणि वाड्या वस्त्यांवर पोहचता यावे व त्याठिकाणी जाऊन नागरिकांशी संवाद साधण्यासाठी मशाल यात्रा सुरुच राहणार आहे. तसेच गाव तेथे शाखा आणि गावातील प्रत्येक घरात ठाकरे पक्षाचे निवडणुक चिन्ह मशाल पोहचविण्याचे काम सर्व शिवसैनिक करणार आहे.
अडचणी असल्यास सपंर्क साधा
पारनेर तालुक्यात राहणाऱ्या नागरिकांना काही अडचणी असल्यास त्यांच्यासाठी सम्पर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. 94214 89705 या टोल फ्री नंबरवर नागरिकांच्या समस्या मागविण्यात येणार आहे. या टोल फ्री नंबरवर फोन करुन, एसएमएस करुन किंवा व्हॉट्सऍपवर संपूर्ण माहितीनीशी, फोटो किंवा व्हीडीओसहित पाठविण्याचे आवाहन पठारे यांच्यावतीने करण्यात आले आहे.