बारामती वाहतूक शाखा व पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा पुढाकार; ८ एप्रिल ते १४ एप्रिलपर्यंत भरता येणार थकीत दंड_
बारामती दि.6 एप्रिल 2024
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना ई-चलन मशीनद्वारे दंड झालेल्या वाहनांना ५० टक्के रकमेच्या सवलतीत आपल्या दंडाची रक्कम भरता येणार आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलातील बारामती वाहतूक शाखा आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे यांच्या वतीने दि.८ ते १३ एप्रिल सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत येथील बारामती वाहतूक शाखा नवीन इमारत (बारामती हॉस्पिटलजवळ) ही लोकअदालत विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.
ई-चलन मशीनद्वारे ऑनलाईन दंड झाल्यास तो वाहन मालकांना भरणे अनिवार्य असते जर ऑनलाईन दंड वेळेत भरला नाही तर पोलीस यंत्रणेकडून न्यायालयात खटले दाखल केले जातात.त्यामुळे नागरिकांना न्यायालयात जाऊन आपल्या वाहनांवरील संपूर्ण दंडाची रक्कम भरावी लागते. पुणे जिल्ह्यातील वाहनांवरील ई-चलन दंडाची आकारलेल्या थकीत रकमेचा विचार करून तसेच नागरिकांचा वेळ आणि रक्कम वाचवण्यासाठी ही सुविधा बारामती येथे उपलब्ध करण्यात येणार आहे. थकीत रकमेच्या ५० टक्के रकमेवर सवलत मिळाल्याने नागरिकांची धावपळ थांबणार आहे. बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर तालुक्यातील तसेच पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. तब्बल सहा दिवसांसाठी ‘हेल्प डेस्क’ सुरु करण्यासाठी लागणाऱ्या सुविधा पोलीस अधीक्षक कार्यालय मार्फतीने बारामती वाहतूक शाखेकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
पुणे ग्रामीण पोलीस, पुणे शहर पोलीस, पिंपरी चिंचवड पोलीस आणि पुणे महामार्ग पोलीस फक्त यांनी केलेले खटल्याचे दंड भरून घेतले जातील इतर जिल्ह्यांनी केलेले दंड भरून घेता येणार नाहीत..
ही सुविधा बारामती येथे सुरु करण्यासाठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मोटार वाहन न्यायालय शिवाजीनगर पुणे येथील न्यायाधीश एस.एच. वानखडे, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष गिरिगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस आमदार सर्जेराव बागल यांनी विशेष प्रयत्न केले.
पुणे न्यायालयातील न्यायालयीन कर्मचारी सुधीर वानखडे, विक्रम पाठक, प्रकाश कुकडे, नितीन गायकवाड, विजय चव्हाण
बारामती वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार अशोक झगडे, सुभाष काळे प्रशांत चव्हाण, रेश्मा काळे, सीमा साबळे, संगीता घुले, सविता काजळे, अजिंक्य कदम, सुधाकर जाधव, सविता धुमाळ, योगेश कांबळे प्रदीप काळे, रुपाली जमदाडे, माया निगडे हे दंड भरून घेऊन कार्यवाही करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
गुढीपाडवा आणि रमजान ईद हे सुट्टीचे वार वगळता ही मोहीम सुरु राहणार असून दंड वसुलीचे कामकाज वाढले तर अधिकचे दिवस ही मोहीम सुरु राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक यादव यांनी सांगितले.
चौकट:
जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन!
‘वाहनांवरील थकीत दंड भरावाच लागतो. मात्र दंडाची रक्कम पन्नास टक्के सवलतीत भरण्यासाठी नागरिकांसाठी ही सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांचा मोठा वेळ आणि पैसा वाचणार आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन आपली थकीत दंडाची रक्कम भरून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे.’
चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक