रोहित पवारांची संघर्ष यात्रा नागपूर मध्ये दाखल
नागपूर दि.10 डिसेंबर 2023
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते (शरद पवार गट) रोहित पवार यांची सध्या संघर्ष यात्रा सुरू आहे. ही यात्रा सध्या नागपूरला पोहोचली आहे. या यात्रेदरम्यान त्यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
रोहित पवार म्हणाले की, MIM पक्ष हा भाजपाकडून पैसे घेऊन निवडणुकीत आपले उमेदवार उभे करतो. तसंच, महाविकास आघाडीचे उमेदवार पाडण्यास एमआयएम भाजपला मदत करतो, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Rohit Pawar MIM drops MVA candidate by taking money from BJP Excitement due to Rohit Pawar s accusation)
रोहित पवार म्हणाले की, प्रकाश आंबेडकर हे संविधान वाचवण्याची भाषा करतात, 2019 मध्ये त्यांनी उमेदवार उभे केल्याने आमचे अनेक उमेदवार पडले. आमचा पण संविधान वाचवण्याचा उद्देश आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी खबरदारी घ्यावी, असा सल्ला रोहित पवार यांनी प्रकाश आंबेडकर यांना दिला आहे.
पटेलांवर का कारवाई होत नाही?
यावेळी रोहित पवार यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. त्यांनी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावरही टीकास्त्र डागलं आहे. रोहित पवार म्हणाले की, नवाब मलिक यांच्यावर कारवाई करण्यात येते, मात्र त्याचवेळी प्रफुल्ल पटेल यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. पटेल यांच्यावरदेखील गंभीर आरोप आहेत. मात्र, पटेल यांनी अजित पवारांना भाजपसोबत एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न केल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही का? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
त्या पत्राबाबत कोणीही विचारणा केली नाही
अजित पवार यांना विरोधी पक्षनेते बनवण्यासाठी राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांनी पत्रावर सह्या केल्या होत्या. मात्र, त्या पत्रात नेमकं काय लिहिलं आहे, याबाबत कोणीही विचारणा केली नव्हती. त्यामुळे तेच पत्र चोरून सत्तास्थापन केली. त्या पत्राचा अजित पवार गटाने दुरुपयोग केल्याचा दावाही यावेळी रोहित पवार यांनी केला आहे.