उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कठोर कारवाईचे आश्वासन
श्रीगोंदा दि.13 मार्च 2025
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदाचे आमदार विक्रम पाचपुते हे असली पनीर आणि नकली पनीर घेऊनच बुधवारी विधानसभेत गेले आणि दूधच नसलेल्या, व्हेजिटेबल फॅटचा वापर करून बनविल्या जाणाऱ्या नकली पनीर वर बंदी आणणार का, त्यांच्या उत्पादकांना तुरुंगात टाकणार का, असा प्रश्न त्यांनी सरकारला केला.
त्यावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
काय सांगता… ७५ टक्के चीजमध्ये भेसळ?
• लक्षवेधी सूचना मांडताना एका हातात नकली तर दुसऱ्या हातात असली पनीर पाचपुते यांनी सभागृहात उंचावून दाखविले आणि ते अध्यक्षांकडे पाठविले. पाचपुते म्हणाले की, अॅनालॉग चीज हा पदार्थ राज्यात अनेक ठिकाणी अॅनालॉग पनीर, आर्टिफिशियल पनीर म्हणून विकला जात आहे. त्यात दूधच नसते.
● त्यांनी दावा केला की दररोज विक्री होणाऱ्या पनीर, चीज पैकी ७५ टक्के हे नकली असते. त्यातून ग्राहकांची फसवणूक होते आणि दूध उत्पादक कंपन्या, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
● उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले की, या प्रश्नावर विक्रम पाचपुते यांच्यासह संबंधित आमदार, अधिकाऱ्यांची बैठक अधिवेशन संपण्यापूर्वी घेऊन कारवाई केली जाईल. नकली पनीरला आळा घालण्यासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री, पुरेसे मनुष्यबळ पुरविले जाईल.