दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेणार :विखे
नगर दि.26 डिसेंबर 2023
खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ठोस पाऊले उचलण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले असून या अनुषंगाने ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिवाजीराव कर्डिले यांच्यासमवेत जानेवारी महिन्यात दिल्ली येथे अमित शाह यांना भेटणार आहेत.
या भेटीदरम्यान कांदा निर्यातीवरील बंदी उठवण्यासाठीची चर्चा अमित शाह यांच्या सोबत करणार असून यातून कांदा निर्यात बंदी उठवून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होणार आहे. तसेच कांद्याचा भाव स्थिर होण्यासाठी एक मासिक कोटा निश्चित करून कांद्याला हमी भाव मिळण्याच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ते उदरमल ता. नगर येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, तालुकाध्यक्ष दीपक कार्ले, राजेंद्र तोरडमल, देविदास आव्हाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली असून याचा मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी सदरील भेट घेतली जाणार असून निश्चितच शेतकरी हिताचा विचार केला जाईल असे देखील खासदार सुजय विखेंनी बोलताना स्पष्ट केले.
तसेच त्यांनी बोलताना या गोष्टीवर देखील भाष्य केले की, मागील दीड वर्षाच्या काळात महायुतीचे सरकार नव्हते तेव्हा मोठ्या प्रमाणात निधीची कमतरता भासत होती. परंतु आता महायुतीचे सरकार आल्यापासून अहमदनगर जिल्ह्याला कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडत नाही आणि यापुढेही विविध विकास कामांना प्राधान्य देऊन भरीव निधी हा उपलब्ध करून देण्यात येईल.