खाजगी करण्याच्या मुद्यावर सौ. राजळे यांचा सरकारवर ‘हल्लाबोल’
राहुरी दि.२१ ऑक्टोबर २०२३
देशात राज्यात सर्वत्र आरक्षणान विषयाची जोरदार चर्चा सुरु असताना दुसरीकडे मात्र केंद्र सरकारकडून शिक्षणाचे खाजगीकरण, नौकरीचे कंत्राटीकरण करण्याच्या ज्या हालचाली सुरु आहेत, अशावेळी दिल्या जाणाऱ्या ‘त्या’ आरक्षणाचा उपयोग काय असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ योगिता शिवशंकर राजळे ह्यांनी केला.
जिल्हाध्यक्ष राजळे या आज राहुरी येथे तालुक्यातील महिला पदाधिकारी ह्यांचेशी संवाद साधण्यासाठी आल्या होत्या, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहुरी,नगर,पाथर्डी विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्षा वैशाली टेके होत्या. यावेळी राहुरी नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा डॉ.सौ.उषाताई तनपुरे, तालुकाध्यक्षा शारदा खुळे, शहराध्यक्षा अपर्णा ढमाळ, जिल्हा सरचिटणीस कमल गाडे,आदि उपस्थित होत्या.
पुढे बोलताना सौ.राजळे म्हणाल्या की, पक्षाध्यक्ष शरद पवार व प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील व खासदार सुप्रिया ताई सुळे ह्यांनी माझ्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबबाबदारी दिल्यानंतर माझा हा राहुरी तालुक्याचा पहिलाच दौरा असून आज या दौऱ्या निमित्त राहुरी तालुक्यातील महिला पदाधिकाऱ्यांशी संपर्क करून त्यांचेशी संवाद साधत त्यांचे प्रश्न जाणून घेतले .त्यात उपस्थित सर्व महिला पदाधिकाऱ्यांचे विचार ऐकून पक्ष संघटनेसाठी काय करता येईल यावर चर्चा केली. आम्ही महिला बाहेर पडलो ते राष्ट्रवादी पक्षासाठी ,याचे श्रेय पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे आहे. आज समाजात राजकारणात सर्व गोंधळचे वातावरण असल्याने सर्व समाज गोंधळून गेला आहे. त्यात महिलांना समोर हाच प्रश्न उभा आहे. अश्याही परिस्थितीत पक्षाच्या वतीने आम्हाला जे जे मार्गदर्शन मिळते त्याप्रमाणे काम सुरु आहे. देशात सर्वत्र खाजगीकरणाचे वारे तसेच नौकरीचे कंत्राटीकरणाचे प्रयत्न सुरु असल्याने हा विषय महिलांचे दृष्टीने महत्वाचा असून त्याचा मोठा फटका महिलांना बसणार आहे. तसेच देशात राज्यात सर्वत्र आरक्षणाचा विषय महत्वाचा बनला असून देशात मात्र सत्तेवर असलेल्या सरकारचा सर्वत्र नौकऱ्यांचे खाजगीकरण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याने आरक्षणाचा काय फायदा असा सवाल सौ.राजळे ह्यांनी केला. पक्षाची ध्येय धोरणे पक्षाध्यक्ष शरद पवार ह्यांचे विचार तळागाळातील महिला पर्यंत पोहचविण्याचे काम महिला संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.
राहुरी खुर्द ग्रामपंचायतीच्या सदस्या अश्विनी कुमावत म्हणाल्या की,जिल्हाध्यक्ष योगिता राजळे ह्यांनी जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्या नंतर त्यांनी जिल्ह्यातील महिला पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचा जो उपक्रम हाती घेतला तो स्तुत्य आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार ह्यांनी महिलांना राजकारणात आरक्षण दिल्यानंतर महिला ह्या फक्त चूल व मुलं हयात न राहता घराच्या बाहेर पडून आज समाजात ग्रामपंचायत सदस्या पासून ते राष्ट्रपती पदा पर्यंत पोहचून चांगले काम करीत आहे.आज जो गोंधळ सुरु आहे त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना शरद पवार ह्यांनी केली असून त्यांचे तसेच खासदार सुप्रियाताई सुळे आमदार प्राजक्त तनपुरे यांचे हात बळकट करण्यासाठी येत्या निवडणुकीत त्यांचे पाठीशी उभे राहिले पाहिजे.
अध्यक्षस्थानावरून बोलताना वैशाली टेके म्हणाल्या की पक्षाचे अध्यक्ष मा.शरद पवार साहेब खासदार सुप्रियाताई सुळे ह्यांनी महिलांना राजकारणात प्रेरणा दिल्याने महिला सर्व क्षेत्रात चांगल्या पद्धतीने काम करीत आहे. यापुढे सर्व महिलांनी पक्षाचे विचार ध्येय धोरणे राबविण्यासाठी तळागाळातील महिलांपर्यंत पोहचुन पक्ष संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
यावेळी माजी नगराध्यक्षा सुमती सातभाई,माजी नगरसेविका संगीता आहेर, उषा कोहकडे, आशा काकडे, अनिता म्हसे, नंदा पवार, भारती बाफना तसेच राष्ट्रवादीचे पाथर्डी अध्यक्ष शिवशंकर राजळे,प्रदेश सरचिटणीस मिलिंद अनाप, ओबीसी शहराध्यक्ष महेश उदावंत, श्रीराम गाडे आदि उपस्थित होते.