शेतात शेंगा काढणे पडले महागात, श्रीगोंदा तालुक्यातील काळिमा फासणारी घटना
श्रीगोंदा :दि.3 जून 2024
स्वतःच्या शेतात शेंगा काढणाऱ्या पस्तीस वर्षीय महिलेला धमकावत तिच्यावर अत्याचार करण्याची घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली. काल रविवारी सायंकाळी सात वाजता घडलेल्या या प्रकाराची फिर्याद आज श्रीगोंदा पोलिसात देण्यात आली. दरम्यान, अत्याचार केल्यानंतर या महिलेवर चाकूसारख्या हत्याराने वार केल्यानंतर या महिलेला बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवरत आरोपीस अटक केली आहे.
पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, ही ३५ वर्षीय महिला स्वतःच्या शेतात शेंगा काढण्याचे काम करत होती. तेथे संशयीत आरोपी भाऊसाहेब उत्तम दांगडे (रा. घुगलवडगाव, ता. श्रीगोंदा) हा आला. फिर्यादी महिला व आरोपीचे यापूर्वीचेही वाद आहेत. त्याच वादातून यापूर्वी झालेली केस मागे घे, म्हणत आरोपीने फिर्यादीस धमकावले. केस मागे घेतली नाही तर तुझ्या दोन्ही मुलांना मारुन टाकण्याची धमकी दिली. फिर्यादीने नकार दिला असता, आरोपीने फिर्यादी महिलेचे कपडे फाडून तिच्यावर अत्याचार केला. महिलेने आरडाओरडा केला असता आरोपीने त्याच्याजवळील टणक वस्तूने हल्ला केला. या हल्ल्यात फिर्यादी महिलेच्या मांडीवर व छातीवर गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर फिर्यादीस बेशुद्ध असवस्थेत श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आज पोलिसांनी रुग्णालयात जात फिर्यादीचा जबाब घेतला. त्यानुसार भाऊसाहेब दांगडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यास तत्काळ अटक करण्यात आली. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय संपत कान्हेरे हे पुढील तपास करत आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून श्रीगोंदा तालुक्यात कायद्याचे राज्य आहे का, हा प्रश्न पडला आहे. महिलांना धमकाविण्याचे प्रकार वाढले आहेत. पोलिसांनी अँक्शन मोडवर येऊन आपला वचक कायम ठेवावा, अशी मागणी तालुक्यातून होत आहे.