नगरीपंच्या वृत्तामुळे पोलीस यंत्रणा ॲक्शन मोडवर….
श्रीगोंदा दि.10 नोव्हेंबर 2023
छळामुळे विवाहितेचा मृत्यू झाला होता या घटनेला पंधरा दिवस उलटून जाऊन ही आरोपींना अटक होत नव्हते,यामुळे संतप्त विवाहितेच्या माहेरच्यांनी
श्रीगोंद्यात कायद्याचे राज्य आहे का? असा सवाल उपस्थित केला होता, याच अनुषंगाने नगरीपंचने आवाज उठवला होता.
याबाबतची माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील वैशाली राहुल दरेकर या 26 वर्षीय विवाहितेने 19 ऑक्टोबरला विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. सासरी होणाऱ्या छळाला व वारंवार पैशाच्या मागणीला कंटाळून तिने आत्महत्या केल्याची फिर्याद मृताचा भाऊ दीपक काकडे (रा. कोंभळी, ता. कर्जत) यांनी दिली होती. श्रीगोंदा पोलिसांनी पती राहुल आश्रु दरेकर, सासरा आश्रु चंद्रकांत दरेकर, सासू मथूरा दरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र घटनेला 15 दिवस उलटूनही आरोपींना अटक झाली नव्हती. पोलिस या गुन्ह्याचा तपास करताना टाळाटाळ करत असल्याचा आरोप मृत विवाहितेच्या माहेरच्यांनी केला होता. याबाबत जिल्हा पोलिस अधिक्षकांसह गृह मंत्रालय तसेच जिल्हाधिकाऱ्यांही निवेदन पाठविण्यात आले होते.
बहिणीच्या सासरच्यांनी वेळोवेळी पैशाची मागणी केली. यापूर्वी घरासाठी दोन लाख दिले असताना आता गाडी घेण्यासाठी तिच्या सासरच्यांना पुन्हा पैसे हवे होते. यापूर्वी दिलेल्या पैशाचे पुरावे पोलिसांना देऊनही पोलिस आरोपींना अटक करण्यास टाळाटाळ करत असल्याचे निवेदनात फिर्यादीनी म्हटले होते. शिवाय आरोपींची पोहोच वरपर्यंत असल्याचेही मध्यस्थी सांगत असून प्रकरण मिटविण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप फिर्यादीनी निवेदनात केला होता.
सामान्यांना न्याय मिळत नसेल तर तालुक्यात कायद्याचे राज्य आहे का, असा सवाल करत मृताच्या नातेवाईकांनी उपोषण करण्याचा इशाराही दिला होता. आरोपी मोकाट असून त्यांच्या जबाबही न नोंदविणाऱ्या दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी काकडे कुटुंबियांनी गृह मंत्रालयाकडे केली होती .
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नगरी पंचने आवाज उठवला होता. नगरीपंचच्या वृत्ताने पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली व 24 तासाच्या आत मुख्य आरोपी मृताचा पती राहुल आश्रु दरेकर याला पोलिसांनी जेरबंद केले. त्याला काल दुपारी मा.न्यायालयात हजर केले असता मा.न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या संदर्भात नगरीपंचने तपासी अधिकारी पो.उप.नि.झंजाड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले लवकरच उर्वरित आरोपींना अटक केली जाईल.