नागवडेंनी अजित दादांकडे केलेल्या मागणीला यश
श्रीगोंदा दि.24 फेब्रुवारी 2024
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अजित दादा पवार यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये कुकडी व घोड कालव्याचे आवर्तन १ मार्चपासून सोडण्याचा निर्णय झाला असून घोड नदीवरील बंधारे भरून घेणार आहेत. तसेच घोडचे दुसरे आवर्तन १ मे पासून सोडण्यात येणार असल्याची माहिती सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे यांनी दिली.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अजितदादा पवार यांचे अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक शनिवार ता. २४ रोजी सकाळी ८ वाजता सर्किट हाऊस पुणे येथे झाली. सदर बैठकीस सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, आ. रोहित पवार, आ. राम शिंदे, आ. बबनराव पाचपुते, आ. अतुल बेनके, आ. निलेश लंके , सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे , अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष प्रशांत गायकवाड , बाळासाहेब शिंदे यांच्याबरोबर कुकडी पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी झालेल्या निर्णयानुसार कुकडी व घोड कालव्याचे आवर्तन हे १ मार्च पासून सोडण्यात येणार असून घोड नदीवरील बंधारे भरून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे घोड कालव्याचे दुसरे आवर्तन १ मे पासून सोडण्यात येणार असल्याचा निर्णय झालेला आहे. या आवर्तनाच्या सुरुवातीसच विसापूर तलावामध्ये पुरेशा प्रमाणात पाणी सोडण्याची आग्रही मागणी नामदार अजितदादा पवार यांचेकडे करण्यात आली असून उन्हाळ्यामध्ये फळबागांना व चारा पिकांना जीवदान देण्याकरिता पाण्याची आवश्यकता भासणार असल्यामुळे तशा सूचना आताच संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात याव्यात अशी आग्रही मागणी केली असून सदर मागणीचा सकारात्मक विचार करू असे सांगितल्याचे श्री. नागवडे यांनी सांगितले.