नागवडे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोसांची शरद पवार गटात होणार घरवापसी ?
श्रीगोंदा दि.9 एप्रिल 2024
नागवडे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी नुकतीच खा. शरद पवार यांची भेट घेतल्याने त्यांच्या घरवापसीची चर्चा रंगली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याची व जिल्ह्याची जबाबदारी दिलेल्या राजेंद्र व अनुराधा नागवडे यांना ‘होमग्राऊंड’वरच मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नागवडे कारखान्याच्या निवडणुकीपासून तालुक्यात नागवडे गटासोबत राहण्याची भूमिका बाबासाहेब भोस यांनी घेतली होती. त्याचवेळी आपण खा. शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहणार असल्याचे स्पष्ट करायला भोस विसरले नव्हते. मात्र, मागील महिन्यात अनुराधा व राजेंद्र नागवडेंनी अजित पवार गटात प्रवेश केला. त्यावेळी नागवडेंच्या आग्रहाखातर भोस यांनीही ‘घड्याळ’ हाती घेतले. मात्र, बाबासाहेब भोस यांचे मन अजित पवारांच्या राष्ट्रवादीत रमत नसल्याचे चित्र आहे. मागील आठवड्यात नागवडेंनी आयोजित केलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्याचे नियोजित अध्यक्ष असतानाही भोस अनुपस्थित राहिले. तर नगर येथे झालेल्या जिल्हा राष्ट्रवादीच्या मेळाव्याकडे देखील भोसांनी पाठ फिरविल्याची माहिती आहे.
त्यातच शुक्रवारी(दि.५) सायंकाळी जेष्ठनेते बाबासाहेब भोस यांनी खा. शरद पवार यांची पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी माजी आमदार दादाभाऊ कळमकर उपस्थित होते. या भेटीमुळे भोस पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, शरद पवार गटाचे लोकसभेचे उमेदवार निलेश लंके हे भोस यांचे नातेवाईक आहेत. लोकसभा निवडणुकीत लंके यांना मदत करण्याची भोसांची भूमिका असल्याची चर्चा आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोस यांचा शरद पवार गटात प्रवेश होण्याची अटकळ बांधली जात आहे.
चौकट
‘रयत’मधील शिक्षकांच्या प्रश्नांसदर्भात खा. शरद पवार यांना भेटलो होतो. गुरुवारी(दि.११) पत्रकार परिषद घेऊन राजकीय भूमिका स्पष्ट करू.
– बाबासाहेब भोस, उपाध्यक्ष, नागवडे कारखाना