स्फोट प्रकरणातील मुख्य संशयीताला अटक, सात दिवसांची मिळाली पोलिस कोठडी
श्रीगोंदा, ता. 18-जून 2024
तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथील स्फोट प्रकरणातील आरोपी संजय शामराव इथापे (वय 52, रा. टाकळीकडेवळीत, ता. श्रीगोंदा) याला काल रात्री उशिरा अटक करण्यात आली. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. नगरी पंचने याबाबत वारंवार आवाज उठविल्यानंतर अखेर आरोपीला अटक करण्यात आली. दरम्यान, स्फोटाच्या फिर्यादीत उल्लेख असलेले पोकलेन मशिन पोलिसांना कधी सापडणार, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.
तालुक्यातील टाकळी कडेवळीत शनिवारी विहिरीच्या कामावर स्फोट होऊन तीन कामगारांच्या मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी ब्लास्टिंग ट्रॅक्टरमालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र घटनेला आता तीन दिवस उलटून दोन तपासी अधिकारी बदलण्या पलिकडे पोलिसांच्या हाती फारसे काही लागले नव्हते. पोलिसांनी फक्त तीन ट्रॅक्टर जप्त करुन ते पोलिस ठाण्यात आणले. घटनेतील मुख्य आरोपी व फिर्यादीत उल्लेख असलेले पोकलेन मशीन पोलिसांना का सापडत नाही, असा सवाल नगरी पंचने उपस्थित करुन घटनेचा पाठपुरावा जनसामान्यांपुढे सुरु ठेवला होता. अखेर रात्री उशिरा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुख्य संशयीत आरोपी संजय इथापे याला अटक केली. त्यास श्रीगोंदा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
पोलिसांनी त्याच्याकडे विचारपूस केली असता विहिरीचे काम आपण घेतल्याचे त्याने कबूल केले. मात्र जिलेटीन कोठून आणले, सुरक्षा साधने होती का, स्फोट घडवून आणण्यासाठी परवानगी होती का, डिटोनरचा अजून कोठे साठा आहे का, स्फोटासाठी वापरलेली मिशनरी कोणाची आहे आदी प्रश्नांबाबत त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. आज दुपारी त्यास न्यायालयापुढे हजर केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
हे प्रश्न अनुत्तरीतच…
आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. मग स्थानिक पोलिस नेमका कसा शोध घेत होते, हा प्रश्न आहे. शिवाय फिर्यादीत नमूद असलेल्या पोकलेन मशिनचा ठावठिकाणा पोलिसांना अद्याप का लागला नाही, हाही प्रश्न आहे. डिटोनेटरची संख्या, ते कोठून आणले याची साखळी, ब्लास्टिंग कामात असणारी सगळी यंत्रणा या सगळ्या प्रश्नांची उकल पोलिसांना या सात दिवसांत करावी लागणार आहे.
नगरी पंचचे कौतूक…
पोलिसांनी ठरवले तर हरवलेल्या सुईचा शोधही ते लावू शकतात. मग अपघात घडल्यानंतर तीन दिवस आरोपी व पोकलेन पोलिसांना सापडत नसल्याबाबत नगरी पंचने बातमीच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता. अखेर याच बातम्यांची दखल घेऊन स्थानिक गुन्हे शाखेला आरोपी सापडला. आता पोकलेन मशिन व डिटोनरची साखळी पोलिसांना शोधावी लागणार आहे. नगरी पंच यापुढेही या प्रकरणाचा पाठपुरावा सुरुच ठेवणार आहे. या पाठपुराव्याबाबत सजग नागरिकांनी नगरीपंचचे कौतूक केले.