ताज्या बातम्याश्रीगोंदा नगरपरिषदेमध्ये "पुष्पाराज"...?

श्रीगोंदा नगरपरिषदेमध्ये “पुष्पाराज”…?

spot_img
spot_img

पालिकेचे मालक वेटिंगवर, प्रशासकांचे लक्ष सेटिंगवर..!

श्रीगोंदा :दि ४मार्च २०२५

श्रीगोंदा नगरपरिषद मधील नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्याने प्रशासक कामकाज पाहत आहेत. यामुळे सध्या एकहाती कारभार आहे. नगरसेवक नगरपरिषदेच्या कार्यालयात फिरकत नाहीत. यामुळे नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. कार्यालयातील कर्मचारी चहापान व टाइमपास वर वेळ खर्च करत आहेत. त्यांना नागरिकांच्या कामास वेळ मिळत नसल्याने नागरिकांचे अर्जाचा विसर पडल्याने ते अर्ज देखील सापडत नाहीत. अशी परिस्थिती असताना दररोज नियमितपणे शुद्ध पिण्याचे पाणी देण्याचे वचन नगरपरिषदेचे असताना 365 दिवसांची पाणीपट्टी मागणारी नगरपरिषद दिवसा आड पाणीपुरवठा करते आहे. यात ही पाच सहा दिवस नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. याचे काहीही सोईरसुतक प्रशासकांना असल्याचे दिसत नाही. शहरातील अनेक पेठांचे पथदिवे पेटत नाहीत. कचरा उचलणाऱ्या घंटागाड्या दररोज येणे आवश्यक असताना पाच पाच दिवस शहरात फिरकत नाहीत. डासांचा शहरात सुकाळ असताना धूर फवारणी होत नाही. असे एकना अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. एकूण काय तर श्रीगोंदा शहरात सर्व अलबेल असल्याचे सांगण्यात येत असले तरी काहीही अलबेल नसल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. विद्यमान आ. विक्रम पाचपुते यांचे काही जवळचे समजले जाणारे डोक्याचा घाम पुसणारे व हॅट परिधान करणारे नगरसेवक यांचा वावर नेहमीच नगरपरिषदेमध्ये असल्याचे दिसत आहे. त्यांच्या सल्याने प्रशासक निर्णय घेत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. नगरपरिषदेची पाणीपट्टी मालमत्ता कर, वृक्ष कर, शिक्षण कर असे एक ना अनेक कर नागरिक भरत असल्यानेच कर्मचाऱ्यांचे पगार होऊन त्यांच्या कुटुंबाचा चारिथार्थ चालतो. परंतु याचा विसर कर्मचारी वर्ग व प्रशासक यांना पडलेला दिसतो आहे.

नेहमी समज हीत जपणारे व नागरिकांच्या मूलभूत हक्कासाठी झटणारे दक्ष नागरिक फाउंडेशन चे पदाधिकारी श्रीगोंदा परिषदेच्या कार्यालयात सामाजिक विषयांसाठी गेले असताना, शिवाय प्रशासकांनी सोमवार, बुधवार व शुक्रवार दुपारी 3 ते 5 अशी अभ्यागतांना भेटण्याची वेळ निश्चित केलेली पाटी दालनासमोर लावलेली असताना, याच वेळेत जाऊन देखील जवळपास दोन तास दालनासमोर कार्यकर्त्यांना ताटकळत उभे ठेवले. हे कार्यकर्ते दालना समोर उभे असल्याचे पाहून सुद्धा कोणतीही दखल प्रशासक यांनी घेतली नाही. प्रशासकांच्या भेटीला आलेले नागरिकांना बसण्यासाठी कोणतीही आसन व्यवस्था नगरपालिकेतील प्रशासकांच्या दालनासमोर नाही. म्हणजे नगरपरिषदेचा मालक असलेला नागरिक तासंतास उभा राहतो याची थोडीही खंत प्रशासकांना नाही. यामुळे सध्या श्रीगोंदा नगरपरिषदेमध्ये “पुष्पाराज” सुरु असल्याचे दक्ष चे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते दत्ताजी जगताप व श्रीरंग साळवे यांनी म्हटले आहे.

या आठवड्यात जवळपास पाच ते सहा दिवस पाण्याची पाईप लाईन फुटल्याने नागरिकांना पाणी नव्हते. ज्या ठेकेदाराकडून रस्ता खोदतांना पाईप लाईन फुटली त्याच्याकडूनच नागरिकांना न भेटलेल्या पाण्याची पट्टी नगरपरिषदेने घ्यावी. पाणी न भेटलेल्या दिवसांची पाणी पट्टी नागरिकांनी का भरावी…? असा सवाल दत्ताजी जगताप व श्रीरंग साळवे यांनी प्रशासकांना विचारला आहे.

मार्च एंडींग चे कामे तसेच कामांची बिले काढण्यासाठी धनादेशांवर स्वाक्षरी करून घेण्यासाठी आणि कोणते बिले काढायचे याचे सल्ले देण्यासाठी थेट प्रशासकांच्या दालनात घुसलेले घाम पुसणारे व हॅट परिधान गेलेले ते नगरसेवक दोन तास दालनात ठिय्या देऊन बसले होते मात्र त्यांच्याही अगोदर आलेले नागरिक तसेच ताटकळत दालनासमोर उभे होते. म्हणजे कर भरणारे नागरिकांना वेगळा न्याय तर श्रीगोंदा लुटणारे यांना वेगळा न्याय असे का…?

लुटारूना लगेच थंड पाणी गरमागरम चहा मात्र उभे असलेले नागरिकांना बसण्यासाठी साधी खुर्ची देखील नाही हा मोठा विरोधाभास श्रीगोंदा नगरपरिषदेमध्ये दिसून येतो आहे. 31 मार्च उलटून गेलेली असून देखील 2 एप्रिल रोजी किती व कोणत्या धनादेशांवर प्रशासकांनी स्वाक्षरी केल्या याची माहिती घेणार असल्याचे जगताप व साळवे यांनी सांगितले.

श्रीगोंदा नगरपरिषदेमध्ये नागरिकांच्या हिताचे कामे होत नसून फक्त स्वहिताचे कामे होताहेत. कामासाठी आलेले नागरिक यांना वेटिंगवर ठेवले जात असून प्रशासकांचे लक्ष फक्त आर्थिक सेटिंगवर असल्याची चर्चा सर्वत्र होताना दिसते आहे.

लेटेस्ट न्यूज़