बेछूट आरोप करणाऱ्यांना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांचा इशारा
अहमदनगर दि.9 जानेवारी 2023
तलाठी भरती प्रक्रिया पारदर्शकपणे सुरू आहे, गुणवत्ता यादीही प्रचलित धोरणाप्रमाणे जाहीर करण्यात आली आहे. या प्रक्रियेत बाह्य हस्तक्षेपाला संधी नाही. परंतु तरीही बेछूट आरोप केले जात आहेत.
एक आमदार तर ३० लाख, २० लाख दिल्याचे आरोप करत आहेत. त्यांचे हे आरोप प्रसिद्धीसाठी आहेत. असे बेछूट आरोप करून सरकारची बदनामी केली जात असेल तर गुन्हा दाखल करावा लागेल, असा इशारा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिला आहे.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तलाठी पदाच्या भरती प्रक्रियेच्या चौकशीसाठी ‘एसआयटी’ नियुक्त करायची मागणी केली, याकडे लक्ष वेधले असता विखे यांनी चौकशीसाठी आम्ही तयार आहोत, हवे असेल तर वडेट्टीवार यांच्या पक्षाचे सदस्य त्यामध्ये नियुक्त करावेत, आमची काही हरकत नाही, परंतु ही भरती प्रक्रिया रद्द होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
तलाठी पदासाठी यापूर्वी सन २०१७ व २०१९ मध्ये भरती प्रक्रिया राबवली गेली. त्याच पद्धतीने सध्याही प्रक्रिया राबवली जात आहे. ‘टीसीएस’ या त्यावेळच्या कंपनीकडेच ही प्रक्रिया सोपवली गेली आहे. १० लाख ४१ हजार उमेदवारांपैकी ८ लाख ६४ हजार उमेदवारांनी परीक्षा दिली. ४ जानेवारीला प्रक्रिया पूर्ण झाली. ५७ अवघड प्रश्नांचे सामान्यीकरणाद्वारे गुण देण्यात आले आहेत. यामध्ये विसंगत काही नाही. त्यातूनच ४८ उमेदवारांना २०० पेक्षा अधिक म्हणजे २१४ गुण मिळाले आहेत. भरती प्रक्रियेत कोणतीही अनियमितता झालेली नाही. आरोप करणाऱ्यांनी आधी माहिती घ्यावी.