Thursday, December 19, 2024

श्रीगोंद्यात होणार ‘लॉ’ कॉलेज सुरू : राजेंद्र नागवडे

लॉ कॉलेज सुरू करण्यास राज्य शासनाची परवानगी : राजेंद्र नागवडे 

श्रीगोंदा दि.2 जुलै 2024

तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान श्रीगोंदा संचलित शिवाजीराव नागवडे लॉ कॉलेज चालू शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यास राज्य शासनाची परवानगी मिळालेली असून थोड्याच दिवसात श्रीगोंदा येथे विधी महाविद्यालय सुरू होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

 

यासंदर्भात अधिक माहिती देताना नागवडे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, श्रीगोंदा येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मार्फत शिवाजीराव नागवडे विधी महाविद्यालय सुरू करणेकरिता महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. सदर प्रस्तावाची विद्यापीठामार्फत व शासनामार्फत छाननी होऊन सन 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून सदर लॉ कॉलेज सुरू करणे शासनाच्या उच्च शिक्षण विभागाने मंजुरी दिलेली आहे. सदरचा कोर्स हा तीन वर्षाचा असून प्रवेश क्षमता ६० आहे. ज्याने सीईटी परीक्षा दिलेली आहे असा कोणत्याही शाखेचा पदवीधर विद्यार्थी प्रवेशास पात्र आहे. श्रीगोंदा येथे लॉ कॉलेज सुरू होत असल्यामुळे ग्रामीण भागातील मुला मुलींची कायदेविषयक शिक्षणाची गैरसोय दूर झालेली आहे. श्रीगोंदा येथे जिल्हा सत्र न्यायालय असल्यामुळे याचा निश्चितपणे फार मोठा फायदा विद्यार्थी विद्यार्थिनींना होणार आहे. तरी प्रवेशासाठी इच्छुक उमेदवारांनी महाविद्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन नागवडे यांनी केले आहे.

 

नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा येथे श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, सोनिया गांधी पॉलीटेक्निक इंग्लिश मीडियम स्कूल, बी. एड्. कॉलेज, बेलवंडी शुगर येथील राज्याच्या ग्रामीण भागातील पहिले पॉलिटेक्निक तसेच सुमारे वीस माध्यमिक विद्यालयांची वाटचाल अतिशय यशस्वीपणे चालू आहे. श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास ए प्लस मानांकन मिळालेले असून सावित्रीबाई फुले विद्यापीठातर्फे प्रथम क्रमांकाचा करिअर कट्टा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.

राजेंद्र दादा नागवडे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सर्व शैक्षणिक संस्थांनी नेत्र दीपक प्रगती केलेली असून चालू शैक्षणिक वर्षी पासून लॉ कॉलेज सुरू करण्यास परवानगी मिळाल्यामुळे आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. सदर लॉ कॉलेजला मंजुरी मिळाल्यामुळे सर्व क्षेत्रातून आनंद व समाधान व्यक्त करण्यात येत असून अनेक मान्यवरांनी राजेंद्र दादा नागवडे यांचे अभिनंदन केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या