पक्षातील अंतर्गत वाद शरद पवारांची डोकेदुखी ठरण्याची शक्यता; रोहित पवार अन् जयंत पाटील यांच्यात नेमकं काय घडतंय?
अहमदनगर दि.12 जून 2024
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा 25 वा वर्धापन दिन सोहळा अहमदनगरमध्ये पार पडला. या सोहळ्यामध्ये स्टेजवरच जयंत पाटील (Jayant Patil) आणि रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यात कलगीतुरा रंगला.
यासोबतच रोहित पवार यांनी महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्यावर देखील खोचक टीका केल्याचा पाहायला मिळालं.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर जयंत पाटील यांचे मुंबईतील काही भागात लोकसभा निवडणुकीतील किंगमेकर जयंत पाटील अशा आशयाचे पोस्टर लागले होते. यावर टीका करताना रोहित पवार यांनी सभेत खरपूस समाचार जयंत पाटील यांचा घेतला. कुठेतरी लोकसभा निवडणुकीच आपणच किंगमेकर आहोत अशा शब्दात श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र तसं नाही हे म्हणताना जयंत पाटील यांच्याकडे अंगुली निर्देश केल्याचा पाहायला मिळालं. यासोबतच सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्यावर देखील रोहित पवार यांनी टीका केली.
बाप एका पक्षात आणि मुलगा एका पक्षात असं कसं चालेल? हे म्हणताना रोहिणी खडसे यांच्या भूमिकेवर रोहित पवार यांनी प्रश्नचिन्ह निर्माण करताना एकनाथ खडसे भाजपवासी झालेत मुलगी मात्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात आहेत हे कुठेतरी संशयास्पद असल्याचा प्रश्न उपस्थित केला आहे.
लोकसभा निवडणुकीत यश मिळण्यापूर्वी सातत्याने रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून रोहित पवार यांना पक्ष संघटनेत जबाबदारी दिली गेली पाहिजे अशी मागणी होती. मात्र अद्याप रोहित पवार यांना पक्ष संघटनेत कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. यामागे कुठेतरी जयंत पाटील यांचा हात आहे असा संशय रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांना आहे. नुकताच रोहित पवार यांच्या जवळचा कार्यकर्ता असणाऱ्या विकास लवांडे यांनी रोहित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाच्या युवक संघटनेची जबाबदारी द्यावी. तर जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवून शशिकांत शिंदे यांना प्रदेशाध्यक्ष पद द्यावी, अशी मागणी केली होती. यावरूनच कुठेतरी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षांतर्गत धुसपुस सुरू असल्याचा पाहायला मिळालं होतं.
काही नेते दोन दगडांवर पाय ठेवून- रोहित पवार
पलिकडे गेलेले बोलत होते की, पवार साहेबांनी विश्रांती करावी. येणाऱ्या विधानसभेत साहेब त्यांना विश्राती देतील. भाजपा हद्दपार होईल. काही नेते दोन दगडांवर पाय ठेवून आहेत. त्यांना सांगा तिकडे जा किंवा इकडे या. काहींचे भाऊ तिकडे, बाप तिकडे असं चालणार नाही. पलिकडे सत्ता असली तरी लोकांनी त्यांना नाकारले आहे. विरोधकांनी जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केले. लोकांना हाताला काम पाहिजे, यासाठी आपण लढलो. देवेंद्र फडणवीस म्हणत होते, पवार साहेबांच्या राजकारणाचा एरा संपलाय. काल सेंट्रल हॉलमध्ये कसं बसले होते? असा सवालही रोहित पवार यांनी केला.