भाऊ…पेट्रोल-डिझेल पेक्षा इलेक्ट्रिकच भारी
अहमदनगर दि.2 नोव्हेंबर 2023
अहमदनगर : इंधनाच्या वाढत्या दराने इलेक्ट्रिक वाहनांना पसंती वाढत आहे. ही वाहने तुलनेने महाग पडत ‘असली तरी या इलेक्ट्रिक वाहनांची विक्री जोरात सुरू आहे. सणाच्या मुहूर्तावर नवीन वाहन खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे.
जिल्ह्यात दसऱ्याच्या मुहूर्तावर जवळपास दोन हजार नवीन वाहने रस्त्यावर आली. यात इलेक्ट्रिक वाहनांचेही प्रमाण वाढलेले आहे.
जिल्ह्यात २०१७ मध्ये वर्षभरात ही संख्या कमी होती. पेट्रोलचे दर परवडत नाहीत, अशी ओरड वाहनचालकांकडून होत आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षात नागरिकांचा ई-वाहनांकडे ओढा वाढला आहे. दुचाकीपासून तर बसपर्यंतची ई-वाहने जिल्ह्यातील रस्त्यांवर धावताना पाहायला मिळत आहेत.
अनेक ‘वेटिंग’वर
दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शेकडो चारचाकींची विक्री झाली. यात दसऱ्याच्या दिवशीही मोठ्या प्रमाणात कारची विक्री झाल्याची नोंद आरटीओ कार्यालयात झाली आहे. मनपसंत चारचाकी खरेदी करण्यासाठी अनेक जण ‘वेटिंग’वर आहेत.
दसऱ्याला दोन हजार वाहनांची विक्री
जिल्ह्यात दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर १५ ते २४ ऑक्टोबरदरम्यान तब्बल २ हजार ५०४ वाहनांची विक्री झाली. यात दसऱ्याच्या दिवशी वाहनांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे.
इलेक्ट्रिक वाहनांचा बाजारही सुसाट
पेट्रोल-डिझेलच्या वाहनांबरोबर इलेक्ट्रिक वाहनांचा बाजारही सुसाट आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर ई- दुचाकींची विक्री झाली, तर काही नव्या ई-कार रस्त्यावर आल्या.