होऊ द्या चर्चा, शिवसेनेचीही आणि साजन पाचपुतेंचीही….
तोडाफोडीच्या राजकारणातून सावरल्यानंतर आता शिवसेनेचा ठाकरे गट थोडा स्थिरस्थावर होऊ पाहत आहे. नगर जिल्ह्यातील ठाकरे गटानेही कात टाकली असून, उपनेते साजन पाचपुते यांनी पायाला भिंगरी लावत सध्या नगर तालुक्यात झंजावात सुरु केला आहे. ‘होऊ द्या चर्चा’ या उपक्रमाच्या माध्यमातून सरकारच्या योजना कशा फसव्या आहेत, याची पोलखोल सध्या सुरु आहे.
साजन पाचपुते गेल्या वर्षापासून जिल्ह्याच्या राजकाराणात चांगलेच चर्चेत आले. सख्खे काका विद्यमान आमदार व माजीमंत्री बबनराव पाचपुते यांच्या त्यांच्याच ग्रामपंचायतीत पराभव करुन या युवा चेहऱ्याने जिल्ह्याचे लक्ष वेधले. अख्खे राजकारण एकीकडे आणि साजन यांची लोकप्रियता एकीकडे अशी लढत रंगली. साजन त्यात वरचढ ठरले. आमदारांची अख्खी यंत्रणा विरोधात असूनही साजन यांनी एकहाती किल्ला लढवत विजयी तोरण चढवले. त्यावेळीच ‘इस बंदे मे दम हे…’ हे राजकीय विश्लेषकांनी जाणले होते. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था, बाजार समिती या सगळ्याच आघाड्यांवर आपल्या जादूची छडी फिरवत साजन यांनी यशस्वी धोबीपछाड डावावर काकाला आस्मान दाखवले.
साजन यांच्या याच करिश्म्याची दखल दस्तूरखुद्द उद्धव ठाकरे यांनाही घ्यावी लागली. त्यांनी साजन यांना आपल्या पक्षात घेत थेट उपनेतेपदाची संधी दिली. शिवाय ठाकरे गटाचे श्रीगोंद्याचे शिवसेना उमेदवारही ते असतीलच. साजन यांनीही मिळालेल्या संधीवर हात साफ करण्याची एकही संधी सोडली नाही. त्यामुळेच सध्या शिवसेनेच्या ठाकरे गटाची होऊ द्या चर्चा उपक्रमात त्यांनी आपली बुलंद तोफ धडाडणे सुरु केले आहे. पंधरा दिवस ते नगर तालुक्यात फिरतील. त्यानंतर जिल्ह्यातील इतर तालुक्यात जातील. श्रीगोंद्यात त्यांची चर्चा आहेच, मात्र आता जिल्ह्यातही साजन यांची चर्चा सुरु झाली आहे.
आता बघूया श्रीगोंद्यात काय होऊ शकते…
साजन पाचपुते हे २०२४ ला आमदारकीचे प्रबळ दावेदार असतील हे सगळ्यात आधी आम्ही सांगितले होते. सध्या स्थितीही तशीच आहे. ठाकरे गटाकडून ते नक्की नशिब आजमावतील. काका विरुद्ध पुतण्या हा संघर्ष त्यावेळी चांगला रंगेल. दुसरीकडे जर सर्वच पक्षांनी महिला उमेदवारांना संधी दिली तर, भाजपच्या प्रतिभाताई पाचपुते, राष्ट्रवादीच्या प्रणोतीमाई जगताप आणि काँग्रेसच्या अनुराधाताई नागवडे यांच्या विरोधात साजन आपल्या मातोश्री सुनंदाताई पाचपुते यांना उभे करण्याची शक्यता आहे. कारण दिवंगत नेते सदाआण्णा पाचपुते यांच्या पत्नी व उपनेते साजन यांच्या मातोश्री सुनंदाताई याही सध्या तालुक्यात वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसत आहेत. एकंदर महिला किंवा पुरुष कशीही लढत झाली तरी, साजन हे अंगाला तेल लावून तयार आहेत. ते कधीही शड्डू ठोकू शकतात, हे नक्की. नगरी पंचकडून सर्व उमेदवारांना आमदार होऊन मुंबईला जाण्यासाठी शुभेच्छा….