श्रीगोंद्याचा पोलिस कर्मचारी लाच स्वीकारताना अटकेत
श्रीगोंदे । दि.28 फेब्रुवारी 2025
लाच घेणं आणि लाच देणं हा गुन्हा असला तरी अनेक शासकीय कार्यालयासह बहुतांश पोलीस ठाण्यात लाचखोरी सुरूच आहे. श्रीगोंदे पोलिस स्टेशनमध्ये गुरुवारी सायंकाळी शहर बीटचे पोलिस कर्मचारी संतोष फलके याला सात हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून ताब्यात घेतले. श्रीगोंदा शहर पोलिस बीटचे काम पाहणारे पो.कर्मचारी संतोष फलके यानी शहरातील एक गुन्ह्यात जामीन करून देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे २० हजार रुपयांची मागणी केली होती. यात तडजोडी नंतर सात हजार रुपये ठरलेली रक्कम स्वीकारताना फलके यास रंगेहात पकडून पथकाने कारवाई केली.
गुन्ह्यात जामीन करून देण्यासाठी मागितली लाच
दरम्यान, तक्रारदाराकडून मारा-मारीच्या गुन्ह्यात जामीन करून देण्यासाठी ही सात हजार रुपयांची लाच तक्रारदाराकडे मागितल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गुरुवारी सायंकाळी श्रीगोंदा पोलिस स्टेशन परिसरात या कर्मचाऱ्याला पकडण्यात आले. अहिल्यानगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. या घटनेने पोलिसात खळबळ उडाली आहे.
चौकट
कुंपणच शेत खातंय..?
यापूर्वीही श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये केस मागे घेणे, जमीन मोजणीसाठी बंदोबस्त देणे, गावोगावी जाऊन हॉटेल व्यवसायांकडून हप्ता वसुली होत असल्याची माहिती आहे. याकडेही पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी लक्ष देण्याची मागणी आता नागरिकांमधून होत आहे.