ताज्या बातम्याश्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाने राखली उत्कृष्ट निकालाची परंपरा

श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाने राखली उत्कृष्ट निकालाची परंपरा

spot_img
spot_img

महाविद्यालयास सहा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त

श्रीगोंदा दि.29 जानेवारी 2024

स्व.शिवाजीराव बापू नागवडे यांनी 1982 मध्ये स्थापन केलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाने उत्तम शैक्षणिक दर्जा राखून उत्कृष्ट निकालाची परंपरा व स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नेत्रदीपक प्रगती केल्यामुळे या महाविद्यालयास वेगवेगळ्या प्रकारचे सहा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले हा महाविद्यालयाचा बहुमान असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष व सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे यांनी दिली.

प्रसिद्धी पत्रकात नागवडे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राद्वारे महाविद्यालयास करिअर कट्टा २०२४ अंतर्गत सहा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.

उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून श्री. छत्रपती शिवाजी महाविद्यालयास महाराष्ट्र राज्यात पाचवा क्रमांक मिळाला असून अहमदनगर जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळालेला आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सूर्यवंशी यांना उत्कृष्ट प्राचार्य म्हणून राज्यात चौथा क्रमांक व अहमदनगर जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळालेला आहे. प्रा. विलास सुद्रिक यांना उत्कृष्ट जिल्हा समन्वयक म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. विद्यार्थ्यांच्या करिअर संसदेस उत्कृष्ट करिअर संसद म्हणून जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला आहे.

‌‌

तालुक्याचे भाग्यविधाते स्व. शिवाजीराव नागवडे तथा बापू यांनी ग्रामीण भागातील मुला मुलींना शिक्षणाची दारे खुली करण्याकरिता 1982 साली शिक्षणाची गंगा आणली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून संस्थेची गुणात्मक वाटचाल उंचावत नेली. 99 विद्यार्थी संख्येवर सुरू केलेल्या महाविद्यालयात आज 3827 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 16 एकराच्या विस्तीर्ण जागेत सर्व सुविधांनी युक्त सुसज्ज महाविद्यालय उभे राहिले असून गतवर्षी झालेल्या नॅक मूल्यांकनामध्ये महाविद्यालयास ए प्लस मानांक मिळालेले आहे ही अतिशय अभिमानाची व गौरवास्पद बाब आहे.

नागवडे यांनी पुढे म्हटले आहे की, प्राचार्य प्राध्यापक व विद्यार्थी हे मोठे परिश्रम घेऊन उत्तम प्राविण्य मिळवत आहेत. विद्यार्थ्यांच्या बौध्दीक विकासाबरोबरच शारीरिक विकासाला प्राधान्य दिले जाते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य विद्यार्थी आत्मसात करीत आहेत. परिणामी उच्चतम निकाल व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे महाविद्यालय नावावर रूपाला आले आहे. प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सूर्यवंशी यांच्या कल्पक व मौलिक व्यवस्थापनामुळे महाविद्यालयास ए प्लस दर्जा प्राप्त करता आला. विविध स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून एका वर्षात 57 विद्यार्थ्यांची पोलीस व सैन्य दलात, 19 विद्यार्थ्यांची नौदलात तर 51 विद्यार्थ्यांची बँकिंग क्षेत्रात निवड झाली आहे ही बाब अत्यंत गौरवास्पद असून संस्थेच्या व तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी आहे.

राजेंद्रदादा नागवडे व जिल्हा बँकेच्या संचालिका सौ. अनुराधा नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोनिया गांधी पॉलीटेक्निक श्रीगोंदा व इंदिरा गांधी पॉलिटेक्निक बेलवंडी शुगर यांनीही यशस्वीरित्या उत्तुंग भरारी घेतली असून या पॉलिटेक्निक मधील शेकडो विद्यार्थ्यांना नोकरीच्या व रोजगाराच्या संधी प्राप्त झालेल्या आहेत. या सर्व शिक्षण संकुलांनी उत्तम प्रगती करून घेतलेली गगन भरारी अत्यंत अभिमानास्पद असल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे, उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, सौ अनुराधाताई नागवडे, सर्व विश्वस्त मंडळ तसेच प्राचार्य डॉ. सतीषचंद्र सूर्यवंशी, प्रा. अमोल नागवडे, प्रशांत भोईटे व प्राध्यापक वर्ग यांचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे.

लेटेस्ट न्यूज़