गुरुवारी मोर्चा सह शहर बेमुदत बंद
श्रीगोंदा दि.15 एप्रिल 2025
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले श्रीगोंद्याचे संत शेख महंमद महाराज मंदिर जीर्णोद्धार वाद ऐरणीवर आला आहे. गुरुवारी (दि. १७) आध्यात्मिक मोर्चा व त्याच दिवसापासून श्रीगोंदा शहर बेमुदत बंद व धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. मंदिर बांधकाम सुरू होईल, तेव्हाच आंदोलन मागे घेण्याचा इशारा यावेळी शहरवासीयांनी दिला.
संत शेख महंमद महाराज मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी स्थानिक आक्रमक झाले असून, तहसीलदारांना निवेदन दिले आहे.
याबाबत तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संत शेख महंमद महाराज हे तालुक्याचे ग्रामदैवत आहे. या मंदिराच्या जीर्णोद्धार कामात काहीजण अडथळा निर्माण करीत आहेत. त्याचबरोबर रूढी-परंपरेने यात्रोत्सव साजरा करणाऱ्या समितीवर निराधार आक्षेप घेऊन आरोप केले जात आहेत, तरी येथील मंदिराच्या जीर्णोद्धार मार्गातील अडथळे दूर होईपर्यंत आम्ही बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत.
सोमवारी श्रीगोंदा येथे मंदिर उभारणीची संकल्प बैठक झाली. याबैठकीत संत शेख महंमद महाराज ट्रस्टचे अध्यक्ष आमीन शेख यांच्यावर टीका करण्यात आली.बंटी बोरुडे व सुभाष आळेकर यांनी जोपर्यंत मंदिराचे काम सुरू होत नाही तोपर्यंत मंदिर बंद करून टाका, अशी भूमिका मांडली.
यावेळी माजी आमदार बबनराव पाचपुते आमदार विक्रम पाचपुते यांच्यासह सर्वपक्षीय नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.