गव्हाणवाडीतील दोन लॉजवर छापा, सहा महिलांची सुटका, दोघांना अटक
श्रीगोंदा दि.29 डिसेंबर 2023
नगर-पुणे महामार्गावरील गव्हाणवाडी येथील दोन लॉजवर बेलवंडी पोलिसांनी छापा घालून ६ पीडित महिलांची सुटका केली. याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली. बालाजी चंदन नरहरी (रा. चादुरेवाडी, हल्ली रा. गव्हाणवाडी) व रामलखन भैय्यालाल वर्मा (रा. मेमरी खुर्द, जि. गवा, मध्य प्रदेश, हल्ली रा. गव्हाणवाडी) अशी त्यांची नावे आहेत. बेलवंडीचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना गोपनीय माहिती मिळाली की, गव्हाणवाडी येथील सोनल गार्डन लॉजमध्ये बालाजी चंदन नरहरी, तर अमृत लॉज येथे आरोपी रामलखन वर्मा हे महिलांकडून वेश्या व्यवसाय करवून घेत आहेत. त्यानुसार, २७ डिसेंबर रोजी बेलवंडी पोलिसांनी वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या आरोपींसह कारवाई करणारे पोलिस पथक पंचासोबत डमी गिन्हाईक पाठवून खात्री केली.
नंतर दोन्ही लॉजवर छापा टाकून कारवाई केली. सोनल गार्डन लॉजमधून तीन महिला, तर अमृत लॉज येथून तीन महिलांची सुटका केली. दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे करीत आहेत.
बेलवंडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध धंद्याबाबत माहिती कळवावी,संबंधितांवरकायदेशीर कारवाई केली जाईल, असे आवाहन पो.नि. ठेंगे यांनी केले आहे.
पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गाजरे, पो.हे.कॉ. नंदकुमार पठारे, भाऊसाहेब यमगर, लेखनिक कैलास शिपनकर, विनोद पवार, सतीश शिंदे, संदीप दिवटे यांनी ही कारवाई केली.