ताज्या बातम्याबदलते वातावरण-अशुद्ध पाण्यामुळे सर्दी,खोकला,तापाने श्रीगोंदेकर त्रस्त

बदलते वातावरण-अशुद्ध पाण्यामुळे सर्दी,खोकला,तापाने श्रीगोंदेकर त्रस्त

spot_img
spot_img

दिवसभरात थंडी, कडक ऊन अन् अशुद्ध पाण्याचा सामना

श्रीगोंदा : गायत्री ढवळे

बदलत्या वातावरणामुळे सर्वसामान्य श्रीगोंदेकर सर्दी, ताप, खोकला, घसा खवखवणे, अंगदुखीने चांगलेच त्रस्त झाले आहेत. पहाटे, सकाळी थंडी, दुपारी कडक ऊन आणि ढगाळ वातावरण अशा प्रकारच्या विषम वातावरणाचा सामना नागरिकांना दिवसभरात करावा लागत आहे. अशा विषम वातावरणाचा नागरिकांच्या रोगप्रतिकारक शक्तीवरही परिणाम होताना दिसत असून, श्रीगोंदा शहरातील जवळपास प्रत्येक घरात एक तरी व्यक्ती आजारी असल्याचे पाहावयास मिळते. यामुळे शहरातील दवाखाने रुग्णांनी तुडुंब भरले आहेत. यामध्ये लहान बालकांचीही संख्या मोठी आहे.

डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कडाक्याच्या थंडीने सर्वसामान्य श्रीगोंदेकर विविध साथीच्या आजारांनी बेजार झाले आहेत. वातावरणातील तापमानाचा पारा घसरल्याने लहान बालके, सर्वसामान्यांसह ज्येष्ठ नागरिकही

सर्दी, ताप, खोकला, घसा खवखवणे, डोकेदुःखी आणि अंगदुखीने त्रस्त झाले आहेत. यासह न्यूमोनिया, जुनाट दमा याने देखील डोके वर काढले आहे. रात्री,पहाटे थंडीची लाट, दुपारी ऊन, मागील दोन दिवसांपासून ढगाळ हवामानाने वातावरण दूषित झाले आहे.

बाधित रुग्णांमुळे इतरांना त्यांची लागण न व्हावी यासाठी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.

वातावरणामुळे श्रीगोंदेकर जरी त्रस्त असले तरी, त्यात श्रीगोंद्यामध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याची वाणवा आहे. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी अनाधिकृतपणे कमी खर्चामध्ये,कमी जागेमध्ये जास्त नफा कमवून देणारा व्यवसाय म्हणजे ‘पाणी फिल्टर’या अनाधिकृत व्यवसायाच्या दुकानाची संख्या शहरात मोठ्या प्रमाणात वाढतंच चालली आहे.

वीस ते तीस रुपये जारची घरपोच सेवा श्रीगोंदेकरांना मिळते. पण यातील पाणी कुठे भरले जाते, ते कसे भरले जाते, त्याची गुणवत्ता काय? हे पाणी शुद्ध की अशुद्ध ठरवण्याची कोणतीच यंत्रणा सध्या प्रशासनाकडे नसल्याने, याबाबत नगरीपंचने यापूर्वीच आवाज उठवला होता. यापूर्वी फक्त प्रशासनाने या फिल्टर पाणी व्यवसायिकांबरोबर फक्त ‘नोटीस फार्स’ बजावून आपला आर्थिक हेतू साध्य केल्याच्या जोरदार चर्चा आहेत.

 

प्रसार माध्यमात बातम्या आल्या की, ‘त्या’ बातम्यांचा संदर्भ देत ‘आमचे काही नाही पेपरला बातमी आली आहे तुम्ही येऊन भेटा’ असे निरोप पाठवतात व आर्थिक तडजोडी करतात अशाही चर्चा आहेत. परंतु प्रसार माध्यमांनी विचारल्यानंतर चौकशी सुरू आहे. कारवाई करणारंच आहोत, असे उत्तर प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून मिळते. परंतु प्रत्यक्षात मात्र कारवाई होत नाही. आणि त्यामुळेच शहरात पाणी फिल्टर व्यवसायात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.

 

शहरात मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय जोरात सुरू आहे. यामुळे आजाराचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात आहे. सर्वसामान्य श्रीगोंदेकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या या फिल्टर पाणी व्यावसायिकांवर कारवाई कधी होणार? व या सर्व गोष्टी पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई कोण करणार ? अशा चर्चा सध्या शहरात होताना दिसत आहेत.

 

खास करून घरात लहान बालके असल्यास त्यांची विशेष काळजी घ्यावी. शक्यतो त्यांना पाणी उकळूनच पाजावे. सकस आहार घ्यावा. तळलेले- तेलकट पदार्थ खाणे टाळावे. संध्याकाळी उबदार कपड्याचा वापर करावा. व्हायरल आजाराची लक्षणे दिसल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घेऊन योग्य उपचार घ्यावेत. संसर्गजन्य आजाराने बाधित रुग्णांनी इतरांना त्याची लागण होणार नाही यासाठी खास करून सार्वजनिक ठिकाणी खबरदारी घ्यावी.

डॉ.शैला डांगे : तालुका आरोग्य अधिकारी श्रीगोंदा

लेटेस्ट न्यूज़