भाजपा हा पक्ष धृतराष्ट्रासारखा झाला असून बाहेरून आलेल्या प्रस्थापितांनाच उमेदवारी देत आहे: सुवर्णा पाचपुते
श्रीगोंदा दि.23 ऑक्टोबर 2024
विधानसभा निवडणुकीच्या घोषणा झाल्याच्या पाचव्या दिवशी भाजपने आपल्या ९९ उमेदवारांची पहिली यादी रविवारी (दि. २० ऑक्टोबर) जाहीर केली. यामध्ये बहुतांश विद्यमानांना तसेच विद्यमानांच्या कुटुंबातील सदस्यांना तिकीट देण्यात आले. आमचा पक्ष म्हणजे पार्टी विथ डिफरंट असा गाजावाजा करत विरोधी पक्षांना घराणेशाही वरून टार्गेट करणारे भाजपच आता घराणेशाहीची पाठ राखण करत असल्याचं दिसत आहे. त्याचं कारण म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत ज्यांना संधी दिली त्यात काही ठिकाणी नेत्यांच्या घरातीलच कोणत्या ना कोणत्या तरी उमेदवाराला संधी दिली. अशोक चव्हाण, धनंजय महाडिक,आशिष शेलार, बबनराव पाचपुते ही अशीच काही नावे त्यामध्ये येतात. त्यामुळे विरोधकांवर घराणेशाहीच्या मुद्द्यावर तुटून पडणाऱ्या भाजपाने स्वतःला सुद्धा घराणेशाहीचा कलंक लावलाय असे बोलले जाते.
भाजपा मध्ये घराणेशाही चालणार नाही. असे सुवर्णा पाचपुते यांनी सांगितले होते परंतु झाले उलटेच अहिल्यानगर मधील श्रीगोंदा मतदारसंघात घराणेशाहीलाच उमेदवारी दिली असल्याची चर्चा आता मतदारसंघात होत आहे.
भाजपने विधानसभा निवडणुकीच्या उमेदवाराची पहिली यादी जाहीर केल्यानंतर भाजपला बंडखोरीचे ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे ,आणि इच्छुकांना तिकीट न मिळाल्याने ते आता बंडाच्या तयारीत आहेत, श्रीगोंदा मतदारसंघात विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी दिल्याने इच्छुक असलेल्या सुवर्णा पाचपुते यांनी नाराजी व्यक्त केली. याचबरोबर त्यांनी अपक्ष लढण्याचा इशारा देखील दिला. भाजपा धृतराष्ट्रासारखा झाला असून बाहेरून आलेल्या प्रस्थापितांनाच पक्ष उमेदवारी देत असल्याची टीक देखील त्यांनी भाजपावरती केली.
सुवर्णा पाचपुते यांना भाजपकडून विधानसभा लढवण्याची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी जोरदार तयारी देखील केली होती. नागरिकांच्या भेटीगाठी, बैठका घेत मतदारसंघ पिंजून काढला होता. मात्र, भाजपने पुन्हा पाचपुते कुटुंबीयांनाच तिकीट दिल्याने त्या प्रचंड नाराज असल्याचे समजते.
काय म्हणाल्या सुवर्णा पाचपुते ?
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून इच्छुक असलेल्या सुवर्णा पाचपुते यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले. सुवर्णा पाचपुते यांनी आपल्या कार्यालयातील भाजप नेत्यांचे फोटो आणि चिन्ह हटवले आहे. मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांना सोडून भाजपने उमेदवारी न देता बाहेरून पक्षात आलेल्या प्रस्थापितांनाच पक्ष उमेदवारी देत आहे. पक्ष धृतराष्ट्रासारखा झाला आहे, अशी टीका पाचपुते यांनी भाजपवर केली.
तसेच भाजपचे चिन्ह कार्यालयातून हटवताना मला भरून आले, असेही त्यांनी सांगितले. पक्षाला माझी ताकद दाखवून देण्यासाठी मी अपक्ष उमेदवारी करणार असल्याचे सुवर्णा पाचपुते यांनी म्हटले. त्यामुळे आता भाजप त्यांची मनधरणी करणार का, हे पाहावे लागेल.
परंतु श्रीगोंदेकरांच्या हक्काच्या उमेदवार म्हणून सुवर्णा पाचपुते यांनी अपक्ष लढावे अशी श्रीगोंदेकरांची मागणी आता जोर धरू लागली आहे.