आता निवडणुकीतून माघार नाही : सुवर्णा पाचपुते
श्रीगोंदा दि.15 ऑक्टोबर 2024
लोकसभा निवडणुकीनंतर आता अनेकांना वेध लागले आहेत ते विधानसभा निवडणुकीचे. विधानसभा निवडणूक आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्वच इच्छुक उमेदवार आपल्या पद्धतीने कामाला लागले आहेत. नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा-नगर हा मतदार संघ सध्या जोरदार चर्चेत आहे. याच मतदारसंघातील चर्चेतील नाव म्हणजे सुवर्णाताई सचिन पाचपुते, सुवर्णाताई पाचपुते यांनी जोरदार तयारी चालविली आहे. त्यांचे श्रीगोंदा मतदारसंघात “फिक्स उमेदवार, सर्वसामान्य जनतेतील आमदार” अशा आशयाचे बॅनर चर्चेचा विषय ठरत आहेत.
श्रीगोंदा-नगर मतदार संघात या निवडणुकीसाठी भाजपा महिला आघाडीच्या माजी तालुकाध्यक्ष असलेल्या सुवर्णाताई पाचपुते यांनी उमेदवारीवर दावा केला आहे. फक्त उमेदवारीवर दावाच नाही तर यावेळी थांबायचे नाही, निवडणूक लढवायचीच असा निर्धार त्यांनी केला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळीच आपली तयारी झाली होती. मात्र, ऐनवेळेस पक्षातील वरिष्ठांनी थांबण्यास सांगितल्यामुळे आपण थांबलो होतो. परंतु, यावेळेस सर्वच वरिष्ठ नेते आपल्याबरोबर असून भाजपचे सर्व कार्यकर्ते आपल्याला उमेदवारीसाठी गळ घालत आहेत. जनतेच्या मनातील आमदार असल्यामुळे यावेळेस भाजपकडून श्रीगोंदा मतदारसंघात आपल्यालाच उमेदवारी मिळेल असा दावा सुवर्णाताई पाचपुते यांनी केला आहे. त्या काष्टी येथे आयोजित पत्रपरिषदेत बोलत होत्या.
आपण निवडणुकीची पूर्ण तयारी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून श्रीगोंदा-नगर मतदार संघातील गावागावात जनसंपर्क करत आहोत. संपूर्ण मतदार संघातील प्रत्येक गावाला आपण भेट दिलेली आहे. गावातील नागरिक, महिला, युवक, युवती यांच्याशी चर्चा केलेली आहे. भाजपाच्या जुन्या नव्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी सतत संपर्क सुरु आहे. सर्वच स्तरातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपणास मिळत असल्याचे सुवर्णाताई पाचपुते यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
कोण आहेत सुवर्णाताई पाचपुते ?
सुवर्णाताई सचिन पाचपुते या काष्टी (ता. श्रीगोंदा) येथील रहिवासी आहेत. त्यांचे माहेर शिरूर तालुक्यातील इनामगाव असून त्यांच्या आई या नगर तालुक्याचे पहिले आमदार स्व. आण्णासाहेब कुटे (गुणवडी ता. नगर) यांच्या पुतणी आहेत. शालेय वयातच त्यांना वकृत्वाची आवड लागली. त्यातच शिरूरचे तत्कालीन आमदार बाबुराव पाचारणे यांनी एका कार्यक्रमात त्यांचे भाषण ऐकले आणि त्यांना थेट निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलण्यास प्रोत्साहित केले.पहिलीच राजकीय सभा त्यांनी गाजविली. तेव्हापासून त्या राजकारण आणि समाजकारणात सक्रीय झाल्या. शिरूर तालुक्यातील पाच कंदील चौकात झालेले स्वर्गीय प्रमोद महाजन यांची सभा त्यांनी गाजवली. त्यानंतर सुषमा स्वराज, गोपीनाथ मुंडे यांच्या समोर बोलण्याची संधी मिळाली. लग्नानंतर त्यांनी श्रीगोंदा तालुक्यात भारतीय जनता पक्षाचे काम सुरु केले.
माजी खासदार स्व. दिलीप गांधी यांनी त्यांना राजकीय पाठबळ दिले. सन २०११ मध्ये त्यांची भाजपा महिला आघाडीच्या श्रीगोंदा तालुकाध्यक्ष पदी निवड झाली. तेंव्हापासून जनतेच्या सुख दुःखात त्या नेहमी सहभागी होत आहेत. नंतर महिला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीसपदीही त्यांनी काम केले.
सुवर्णरत्न पतसंस्थेच्या माध्यमातून गरजूंना अर्थसहाय्य, आरोग्य शिबीरे, स्वखर्चातून गरीब अनाथ मुलींच्या नावे बँकेत ठेव पावत्या करून त्यांना आधार दिला. महिलांसाठी व्यावसायिक मेळावे, महिला संघटन, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी आंदोलने केली आहेत.
१५ वर्षांपासून प्रस्थापितांच्या विरोधात संघर्ष
आजोबा माजी आमदार स्व. आण्णासाहेब कुटे वगळता सासरी आणि माहेरी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ सामाजिक कार्य करण्याची आवड असलेल्या कृषी कन्या सुवर्णाताई पाचपुते या गेल्या १५ वर्षांपासून प्रस्थापितांच्या विरोधात संघर्ष करत आहेत. सन २०१२ मध्ये त्यांनी तत्कालीन पालकमंत्री यांच्या पत्नीच्या विरोधात काष्टी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविली होती. त्यानंतरही त्यांचा संघर्ष कायम आहे. सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळू दिली नाही. सन २०१७ च्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी त्यांना उमेदवारी मिळू नये म्हणून प्रस्थापितांनी कुरघोड्या केल्या,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळीही उमेदवारी नाकारण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्था आणि संघटनात्मक कोणतंही पद त्यांना मिळू नये असे प्रयत्न गेल्या दहा वर्षांपासून करण्यात आले असेही त्या म्हणाल्या,मात्र तरीही या कृषी कन्येने खचून न जाता आपला संघर्ष आणि जनतेच्या सुख दुखात सहभागी होण्याचे कार्य थांबवले नाही. ते अखंडपणे सुरु आहे आणि त्याच जनतेच्या आशिर्वादाने आपण ही विधानसभा निवडणुक लढवणार आणि जिंकणार अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या उमेदवारी मुळे श्रीगोंदा नगर विधानसभा मतदार संघात चांगलीच रंगत येणार हे निश्चित.