अहमदनगर लोकसभेची जागा घेण्याबाबत पक्षप्रमुखांना अहवाल देणार : सुनिल शिंदे
अहमदनगर दि.25 जानेवारी 2024
लोकसभेच्या अनुशंघाने राजकीय वातावरण चांगलेच तापायला सुरवात झाली आहे. महत्वाचा प्रश्न महायुती व महाविकास आघाडीपुढे असा आहे की जागा वाटप. जागा वाटपाचा तिढा महायुती व महाविकास आघाडीपुढे असणार आहे.
आता अहमदनगरमध्ये मात्र नवा ट्विस्ट आला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात दक्षिणेची जागा राष्ट्रवादी लढणार असे शरद पाव गटाकडून जाहीर करण्यात आले होते. त्यांच्याकडून आ. लंके, तनपुरे आदी नावे चर्चेत होती. परंतु आता अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी व अहमदनगर या दोन्ही जागेंवर शिवसेनेने हक्क सांगितला आहे.
नगर जिल्ह्यातील दोन्ही जागा आम्हीच लढवणार असे शिवसेनेने जाहीर केले आहे.
अहमदनगर लोकसभेची शिर्डी मतदार संघाची जागा आम्ही लढवली असल्याने ती आमचीच आहे. मात्र नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जागाही आम्ही मागणार आहोत, येथून लढण्यासाठी तीन वजनदार इच्छुक आमच्या संपर्कात असून महायुती विरोधकांना टेन्शन देणारी ही नावे आहेत. असे शिवसेनेच्या उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे यांनी सांगितले आहे.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा येत्या रविवारी (दि. २८) नगरला होणार आहे. त्याच्या नियोजनासाठी शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक आ. शिंदे यांन शासकीय विश्रामगृहावर घेतली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, युवा सेना राज्य सहसचिव विक्रम राठोड, बाळासाहेब बोराटे, अनिल बोरूडे आदी उपस्थित होते.
नेमकं काय म्हणाले आ. शिंदे
आ. शिंदे म्हणाले, लोकसभेच्या शिर्डी मतदारसंघात मागील निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार उभा होता. त्यामुळे ती जागा आमचीच आहे. याशिवाय दक्षिण लोकसभा मतदार संघाची जागाही आम्ही महाविकास आघाडीकडे मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तीन वजनदार लोक इच्छुक
अहमदनगर जिल्ह्यात दोन्ही जागा आम्ही लढवू असे जाहीर करतानाच शिंदे यांनी आमच्याकडे लढण्यासाठी तीन वजनदार लोक इच्छुक असल्याचा गौप्यस्फोट देखील केला. महायुती विरोधकांना टेन्शन देणारी ही नावे आहेत. आघाडीतील जागा वाटपानंतर ती नावे जाहीर केली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पक्षाचे नवे उपनेते साजन पाचपुते हे पक्षात नवे असून, सध्या संघटनेचे कामकाज समजून घेत आहेत. त्यांच्यासह पक्षातील जे आमच्यासमवेत आहेत, त्या सर्वांवर आमचा विश्वास आहे, ते सर्वजण सक्षम आहेत व त्यांच्यावर भरवसाही आहे असेही आ. शिंदे यांनी स्पष्ट केले.
विधानसभेसाठी ‘या’ जागांवर दावा
विधानसभा निवडणुकीत नगर शहर व पारनेर या जागा पूर्वीपासून आम्ही लढवत आहोत. नेवासाही आमच्याकडे आहे. आता जिल्ह्यातील अन्य जागांवरही चाचपणी सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी श्रीरामपूरची जागा लढवण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे केल्याचे समजते. त्यामुळे नगर शहर व पारनेर या राष्ट्रवादीच्या असणाऱ्या जागा ठाकरे गट घेणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.