अहमदनगर दि.17 ऑक्टोबर 2023
फक्त तीन जणांत कसे होईल, भेसळीचे एक लाख लिटर दूध तयार…?
—
गेल्या मार्च महिन्यात श्रीगोंदा तालुक्यात अमृतात विष कालवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला. दूध भेसळीच्या मोठ्या रँकेटचा अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला. दहा आरोपी अटक केले मात्र हे प्रकरण नंतर अचानक थंड बस्त्यात गेले. आता पुन्हा या प्रकरणाने जोर धरला असून श्रीगोंद्यातील तो मोठा मासा सध्या सैरभैर झाल्याचे चित्र आहे.
त्यावेळी पोलिसांनी अटक केलेल्या 10 जणांपैकी तीन आरोपी हे श्रीगोंद्यातील होते. तालुक्यात रोज सुमारे एक लाख 60 हजार लिटर दूध संकलन व्हायचे. धाड टाकल्यानंतर फक्त 60 हजार लिटर संकलीत होऊ लागले. म्हणजेच सुमारे एक लाख लिटर दूध भेसळीने तयार केले जायचे. प्रकरण मोठे होते. या प्रकरणाने महाराष्ट्र हादरला. मात्र नंतर अचानक तपासात थंडपणा आला. फक्त तीघेजण सुमारे एल लाख लिटर भेसळीचे दूध कसे तयार करु शकतात.. हा प्रश्न अनुत्तरीत राहिला. रँकेट मोठे आहे. त्यामुळे 10 जणांना अटक झाल्यानंतर तालुक्यातील अनेक जण परागंदा झाले. काहींनी लाखो रुपये देऊन आपले नाव येऊ नये म्हणून फिल्डींग लावल्याचीही चर्चा झाली.
सध्या हे प्रकरण पुन्हा एकदा ऐरणीवर आले. श्रीगोंदा तालुक्यातील उत्तरेतील एका गावातील एक मोठा मासा पुन्हा सावध झाल्याचे पहायला मिळत आहे. पोलिस ठाण्यात हस्तकांना पाठवून कुणी आपले नाव घेणार नाही ना, यासाठी फिल्डींग लावल्याची चर्चा आहे. प्रसंगी लाखो रुपये खर्चून सहिसलामत सुटण्यासाठी या मोठ्या माशानेही आपली माणसे पेरल्याची चर्चा आहे. पोलिसांनी या प्रकरणाच्या तळापर्यंत जाऊन तपास करावा अशी मागणी सध्या जोर धरत आहे.
विशेष म्हणजे हा मोठा मासा पोलिसांना माहित असूनही अजून कोणत्याच आरोपीने त्याचे नाव न घेतल्याने तो मोकाट असल्याचे चित्र आहे. या प्रकरणाचे प्रत्येक बारीक-सारीक अपडेट नगरी पंच आपल्यापर्यंत घेऊन येईल, तोपर्यंत पोलिसांना तपासकामी शुभेच्छा…