ताज्या बातम्या'त्या' सरपंचाला जिल्हा सत्र न्यायालयाचा दणका..!

‘त्या’ सरपंचाला जिल्हा सत्र न्यायालयाचा दणका..!

spot_img
spot_img

अटकपूर्व अर्ज फेटाळून लावत न्यायालयाचा उबाळेला धक्का

श्रीगोंदा दि.20 जुलै 2024

तालुक्यातील आढळगावचे सरपंच शिवप्रसाद उबाळे याचा अटकपूर्व जामीन आज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला.अविश्वास ठराव नामंजूर करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्याचे अपहरण केल्याचा गुन्हा उबाळे याच्यासह आठ अज्ञात व्यक्तीं विरोधात मिरजगाव ता. कर्जत पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. दोन दिवसांचा दिलासा दिल्यानंतर न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावत उबाळेंना धक्का दिला आहे.

आढळगाव येथील सरपंच शिवप्रसाद उबाळे आणि उपसरपंच अनुराधा ठवाळ यांच्याविरोधात दहा ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्र येऊन अविश्वास ठराव दाखल केला होता. उत्तमराव राऊत, देवराव वाकडे, अविनाश मिसाळ, मनोहर शिंदे, अंजली चव्हाण, शालन गिरमकर, सीमा बोडखे, लक्ष्मी शिंदे, रोहिणी काळाणे, नितिन गव्हाणे हे दहा ग्रामपंचायत सदस्य एकत्र आल्यामुळे गेल्या साडेतीन वर्षापासून सत्तेवर असलेल्या उबाळेंची सत्ता गेल्यात जमा होती. खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष शरद जमदाडे, उत्तमराव राऊत, माजी उपसरपंच जिजाराम डोके, जालिंदर बोडखे यांच्यासह तरुणांनी लावलेल्या जोरदार फिल्डींगमुळे उबाळे यांना अर्धचंद्र मिळण्याची औपचारिकता बाकी होती.

परंतु, सरपंच उबाळेंनी भाडोत्री गुंडांची मदत घेऊन नितिन गव्हाणे या ग्रामपंचायत सदस्याचे माहिजळगाव ( ता. कर्जत ) शिवारात दोन कारगाड्यांमधून आलेल्या आठ ते नऊ अज्ञात आरोपींनी रिव्हॉल्व्हरच्या धाकाने पळवून नेले. या प्रकारामुळे अविश्वास ठरावाला वेगळे वळण मिळाले.

दरम्यान, तहसीलदार डाॅ. क्षितिजा वाघमारे यांनी बोलाविलेल्या विशेष सभेस नऊ सदस्यांनी उपस्थित राहून ठरावाच्या समर्थनात मतदान केले. परंतु, ठराव मंजूरीसाठी दहा सदस्य आवश्यक असल्यामुळे अविश्वास ठराव नामंजूर करण्यात आला.

अपहरणाविरोधात दिपक राऊत यांनी दाखल केल्यानुसार सरपंच शिवप्रसाद उबाळेसह अन्य सात अज्ञात आरोपींविरुद्ध आर्म ॲक्टसह अपहरण, मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मिरजगाव ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी तातडीने तपास करुन आरोपींची नावे शोधण्यात यश मिळविले. तसेच अपहरण प्रकरणातील मुख्य सूत्रधार अन्य आरोपींच्या अटकेसाठी पोलिस पथकाने प्रयत्न सुरु केले.

श्रीगोंदा येथील जिल्हा सत्र न्यायालयात सरपंच शिवप्रसाद उबाळे याने अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. पहिल्या सुनावणीत न्यायालयाकडून दोन दिवसांसाठी उबाळे याला तात्पुरता जामीन दिला.

पोलिसांची बाजू ऐकून घेतल्यानंतर जामीनावर निर्णय घेतला. रिव्हॉल्व्हरच्या धाकाने अपहरण केले असून गंभीर गुन्ह्य़ातील अन्य आरोपी, दोन गाड्या तसेच रिव्हॉल्व्हर ताब्यात घेणे बाकी आहे. असे मुद्दे फिर्यादींकडून सरकारी वकील केदार केसकर, आणि ॲड. सुमित पाटील यांनी जोरदार युक्तिवाद करत मांडले. सर्व युक्तिवाद ऐकून न्यायालयाकडून सरपंच शिवप्रसाद उबाळे याचा अटकपूर्व जामीन न्यायालयाकडून फेटाळण्यात आला.

लेटेस्ट न्यूज़