श्रीगोंदा पोलिसांना फक्त ट्रॅक्टर सापडले; तिघांचा मृत्यू ठरला अगदी स्वस्त
श्रीगोंदा, ता. 16-जून २०२४
तालुक्यातील टाकळी कडेवळीत शनिवारी विहिरीच्या कामावर स्फोट होऊन तीन कामगारांच्या मृत्यू झाला. ब्लास्टिंग ट्रॅक्टरमालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र घटनेला आता तीन दिवस उलटून दोन तपासी अधिकारी बदलण्या पलिकडे पोलिसांच्या हाती फारसे काही लागले नाही.पोलिसांनी फक्त तीन ट्रॅक्टर जप्त करुन ते पोलिस ठाण्यात आणलेत.घटनेतीलमुख्य आरोपी व फिर्यादीत उल्लेख असलेले पोकलेन मशीन पोलिसांना का सापडेना, असा हा प्रश्न आहे.
टाकळीकडेवळीत विहिरीच्या कामासाठी जिलेटीनचा वापर करुन स्फोट घडवून आणताना हा अपघात घडला होता. या स्फोटात नागनाथ गावडे, सूरज इनामदार, गणेश वाळुंज या तरुणांचा मृत्यू झाला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेतावरिष्ठांच्या आदेशानुसार दोन तपासी अधिकारी बदलून पोलिसांनी पावले उचलल्याचे दाखवले, मात्र तीन ट्रॅक्टर जप्त करुन तपास ठंडावला.
फिर्यादीत उल्लेख केलेला संशयीत मुख्य आरोपी व पोकलेन मशिन 72 तासानंतरही पोलिसांना सापडेना. हे दोन्ही चंद्रावर गेले की काय..? असा संतप्त सवाल नागरीकांतून विचारला जात आहे.
कानून के हात लंबे होते है, हा डायलाँग फक्त चित्रपटापुरताच मर्यादीत आहेका, असा प्रश्न श्रीगोंदेकरांना पडला आहे. पोलिसांनी मनावर घेतले तर ते काहीही करु शकतात. मात्र श्रीगोंदा पोलिस याला अपवाद ठरत असल्याचे सध्याचे तरी चित्र आहे. तिघांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या या गंभीरप्रकरणात राजकीय हस्तक्षेप होतोय का, हे सजग नागरिकांनी शोधायला हवे.
तीन दिवस होऊनही आरोपी सापडत नसेल, पोकलेन मशिन सापडत नसेल तर थेट गृहमंत्र्यांकडे याबाबत कैफीयत मांडण्याची तयारी काहींनी सुरु केली असल्याचे समजते. जिलेटीनच्या कांड्या कोठून आल्या, त्यासाठी परवानगी होती का, हे सगळे प्रश्न संशयीताला अटक केल्यानंतरच सुटणार आहेत. मात्र वेळ गेल्यानंतर या घटनेतील गांभीर्य कमी होण्याचा व आरोपींना पळवाटा मिळण्याच्या शक्यताही व्यक्त केल्या जात आहेत. पोलिसांनी तातडीने तपास करावा, अशी मागणी सध्या नागरिकांतून होत आहे.
पोकलेन मशिन झाले गायब
मलंग शेख याने दिलेल्या फिर्यादीत मृतांना पोकलेन मशिनच्या सहाय्याने विहिरीत उतरविले असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. मात्र तरीही पोलिसांनी फक्त फायर ट्रॅक्टर जप्त करुन ते पोलिस ठाण्यात आणले आहेत. तपासाबाबत नगरीपंचने तपासी अधिकाऱ्यांना फोन केला तर तोही उचलला जात नाही. 72तासानंतरही आरोपी व पोकलेन सापडत नसल्याने, श्रीगोंदा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. या गंभीर प्रकरणाबाबत काही सामाजिक कार्यकर्ते थेट देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार असल्याचे समजते