कर्जत तालुक्यातील प्रकार सासरी नांदणाऱ्या विवाहितेचा खून केल्याचा आरोप
कर्जत दि.10 डिसेंबर 2023
विवाहित बहिणीला जिवे ठार मारुन गुन्हा दाखल झाल्यावर फरार झालेल्या आरोपींविरोधात पुन्हा एक तक्रार दाखल झाली आहे. मृत बहिणीचा दिर हा फिर्यादी भावाला जिवे ठार मारण्याची धमकी देत असल्याचा तक्रारअर्ज ७ डिसेंबरला पोलिस अधिक्षकांना पाठविण्यात आला आहे.
याबाबतची माहिती अशी की, १९ नोव्हेंबरला सोनाली दीपक पांडुळे (रा. बरगेवाडी, ता. कर्जत ) या विवाहितेने फाशी घेऊन आत्महत्या केली होती. मृत सोनालीचा भाऊ गौरव महादेव झिंजे (रा. झिंजेवाडी, ता. कर्जत) याने मात्र आपल्या बहिणीला ठार मारून फाशीचा बनाव केल्याची तक्रार २० नोव्हेंबरला कर्जत पोलिसांत दाखल केली होती. या फिर्यादीवरुन सासू नंदाबाई अंबादार पांडुळे, सासरे अंबादास बलभीम पांडुळे, पती दीपक अंबादास पांडुळे, दीर दादा अंबादास पांडुळे, जाऊ शोभा दादा पांडुळे, ननंद, रेखा तुकाराम देमुंडे (सर्व रा. बरगेवाडी, कर्जत) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल केल्यापासून मृत सोनालीचा दीर दादा पांडुळे हा फरार आहे. त्याने सदर गुन्हा मागे घे, नाहीतर तुझ्या बहिणीसारखा तुझाही काटा काढतो, अशी फोनवरुन धमकी दिल्याचा अर्ज गौरव झिंजे याने पोलिस अधिक्षकांना दिला आहे. आमच्या कुटुंबास धोका असून फरार आरोपींना तातडीने अटक करा, अशी मागणी या अर्जात करण्यात आली आहे.