Friday, December 20, 2024

विखेंच्या सन्मान सोहळ्याचे कवित्व संपता संपेना

 

सुदेश भोसलेंनी आणली कार्यक्रमात रंगत, महिलांचा उदंड प्रतिसाद

गायत्री ढवळेः नगरीपंच ब्युरो टीम

 

जागतीक महिला दिनाचा कार्यक्रम तब्बल आठ दिवस अगोदरच घेऊन सुरु झालेले विखेंच्या श्रीगोंद्यातील कार्यक्रमाचे कवित्व आता कार्यक्रमानंतरही संपत नाहीए. कार्यक्रम पत्रिकेपासून सुरु झालेली नाराजी कार्यक्रमानंतरही कायम राहिली. हा कार्यक्रम फक्त लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊनच आखला गेला होता, अशी टिका आता विरोधकांपासून श्रीगोंदेकरांपर्यंत सुरु झाली आहे.

 

या कार्यक्रमाची पत्रिका प्रसिद्ध झाली आणि टिकेला सुरुवात झाली. कार्यक्रम पत्रिकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून थेट मंत्री छगन भुजबळांपर्यंतच्या नेत्यांचे फोटो होते. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपच्या स्टार प्रचारक पंकजा मुंडे यांच्या फोटोंच्या आधी मंत्री राधाकृष्ण विखेंचा फोटो छापण्यात आल्याने निमंत्रण पत्रिकेची चर्चा वाढली. याच निमंत्रण पत्रिकेत महिलांना आकर्षित करण्यासाठी लकी ड्राँ चे कुपण देण्यात आले होते. सहाजिकच हा कार्यक्रम फक्त गर्दी जमविण्यासाठी आहे, हे तेथूनच स्पष्ट झाले.

 

इतर क्षेत्रातील महिलांकडे डोळेझाक

 

लकी ड्राँत फ्रीजपासून सॅण्डविच मेकरपर्यंत अनेक बक्षिसे ही फक्त गर्दी जमविण्यासाठीच होती का असा प्रश्न उपस्थित केला गेला. आपापल्या क्षेत्रातील चर्चेत असणाऱ्या रणरागिणींचा सन्मान सोहळा खरे तर जिव्हाळ्याचा विषय होता. पुरुषप्रधान संस्कृतीत आपले स्वतःचे वेगळे अस्तित्व दाखविणाऱ्या रणरागिणींचा सन्मान होणे अपेक्षित होते. मात्र पुरस्कारार्थींमध्ये डाँक्टर, वकील, पत्रकार, शिक्षक, शेतकरी महिला, चळवळीतील- तळागाळातील महिला कार्यकर्त्या यांना डावलण्यात आल्याचे दिसले. फक्त गठ्ठा मतदान डोळ्यासमोर ठेऊन सन्मान केले गेले का, हा प्रश्न उपस्थित झाला.

 

कार्यक्रमाचे नियोजन मात्र नेटके

पुरस्कारार्थी ठरविणाऱ्या निवड समितीने सर्वच क्षेत्रातील महिलांना प्राधान्य द्यायला हवे होते, अशी चर्चा आता होऊ लागली आहे. मात्र श्रीगोंद्यात पहिल्यांदाच असा भव्य दिव्य कार्यक्रम झाला, हे यश नाकारुनही चालणार नाही. प्रसिद्ध गायक सुदेश भोसले, अभिनेत्री अमृता खानविलकर, विनोदी कलाकार सुनील पाल, शिवाली परब यांनी कार्यक्रमात रंगत आणली. महिलांना चार तास संसाराच्या व्यापातून मोकळीक देणारा हा कार्यक्रम ठरला. खा. सुजय विखेंचे नियोजनही नेटके राहिले.

आणखी महत्वाच्या बातम्या