मतदारसंघात एमआयडीसीचा मुद्दा पेटला…
कर्जत दि.16 डिसेंबर 2023
आ.प्रा.राम शिंदे यांनीच एमआयडीसी कर्जत राजकीय कारणातून रद्द केल्याचा खोटा आरोप आ. रोहित पवार व त्यांच्या पक्षातील, मित्र पक्षातील कार्यकर्ते करत आहेत. एमआयडीसी मंजुर केली म्हणून हार, तुरे आणि बॅनर बाजी करणारे त्यांचे नेतृत्व या विषयावर धादांत खोटे बोलत होते . प्रत्येक अधिवेशनात एमआयडीसीचा विषय चुकीच्या पद्धतीने मांडत होते सरकारवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते परंतु वस्तुस्थिती वेगळीच होती हे मात्र ते हेतुपुरस्पर मान्य करत नव्हते . प्रस्तावित एमआयडीसी भूसंपादन जागेत काही वादग्रस्त मुद्दे होते त्यामुळे त्याचे भूसंपादन रद्द झाले परंतु एमआयडीसी रद्द झाली म्हणत विनाकारण साप म्हणून भुई धोपटण्याचा कार्यक्रम चालू आहे . जी एमआयडीसी मंजूरच झाली नव्हती ती रद्द कशी करता येईल? विनाकारण या विषयाला खतपाणी म्हणून तसेच हा विषय भडकावण्यासाठी स्थानिक नेत्यांकडून अप्रत्यक्षरीत्या कर्जत बंद, आंदोलने, निदर्शने घडवून आणत आहेत. मात्र ही प्रस्थापित एमआयडीसीची जागा आ.राम शिंदे यांनी नव्हे तर औद्योगिक विकास महामंडळाने रद्द केली आहे,’ असे मत भाजपा तालुकाध्यक्ष शेखर खरमरे यांनी व्यक्त केले.
याबाबत पुरावा म्हणून त्यांनी महामंडळाला मागितलेल्या बैठकीच्या लेखी इतिवृत्ताचा खुलासा पत्राद्वारे जाहीर केला आहे. तालुकाध्यक्ष श्री शेखर खरमरे यांनी मागितलेल्या महामंडळाच्या इतिवृत्तात एमआयडीसी रद्द करण्याची कारणे स्पष्ट केली आहेत.त्यात असे नमूद करण्यात आले आहे की,’प्रस्तावित संपादनाअंतर्गत असलेल्या जमिनी बागायती असल्याने मौजे खंडाळा व पाटेगाव या गावांच्या ग्रामसभेचा संपादनासाठी असलेला विरोध, वन विभागाची ना हरकत घेणेची बाब तसेच वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्या मालकीच्या जमिनी सदर संपादनांतर्गत असल्याची निदर्शनास असलेली बाब विचारात घेता कर्जत तालुक्यात एमआयडीसी स्थापन करण्यासाठी अन्य गावातील जमिनीचा शोध घेण्याची कार्यवाही १५ दिवसात करण्याचे दिनांक १२/१२/२०२३ रोजीच्या बैठकीत निर्णीत झाले’ असे इतिवृत्त नाशिकच्या प्रादेशिक अधीकाऱ्यांनी दिले आहे. खरमरे पुढे म्हणाले,’ राष्ट्रवादी पक्षाचे व त्यांच्या मित्रपक्षाचे कार्यकर्ते मतदारसंघातील जनतेची दिशाभूल करत आहेत. ज्यानी या औद्योगिक वसाहतीला ग्रामसभेत ग्रामस्थांबरोबर विरोध केला त्यानीच विरोधासाठी विरोध म्हणून आ.राम शिंदे यांच्यावर खंडाळा व पाटेगाव येथील प्रस्तावित एमआयडीसी रद्द करण्याचे खापर फोडले आहे. तर काहींनी या विषयावर संशोधनात्मक बोलताना चप्पल बुटाचीही सेवा करण्याची भाषा केली आहे. राष्ट्रवादी व त्यांच्या मित्रपक्षाचे कार्यकर्ते सुज्ञ आहेत. ते कायद्याचे अभ्यासकही आहेत, परंतु त्यांनी अगदीच पोरकट नेत्याच्या दबावातुन या प्रश्नी पोरकट भुमिका घेऊन वस्तूस्थीतीचा जाणीवपूर्वक विप्रयासही केला. एमआयडीसी मंजूरच नव्हती तर रद्द होण्याचा प्रश्नच नाही .कमीत कमी प्राथमिक माहिती घेऊन तरी आरोप करायला पाहिजे होते . अशा या पोरकट भूमिकांची पोलखोल आणि वस्तुस्थिती संबंधित पत्राद्वारे स्पष्ट होत आहे.आ.प्रा.राम शिंदे मंत्री पदावर असल्यापासूनच एमआयडीसीसाठी आग्रही होते. त्यासाठी त्यांनी वरिष्ठ पातळीवर बैठकाही घेतल्या होत्या.चमकोगीरी करण्यासाठी व आपल्या नेत्याला बरे वाटण्यासाठी कार्यकर्ते काहीही बरळत आहेत. नेते कार्यकर्त्यांनी केलेले बेछुट आरोप प्रादेशिक अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या पत्राने हाणून पडले असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे तालुका समन्वयक पप्पू शेठ धोदाड यांनी दिली.