काँग्रेसचा विचार जनतेत पुन्हा रुजविणार : बाळासाहेब थोरात
मुंबई दि.3मार्च2024
कमी कालावधीसाठी व वैयक्तिक स्वार्थापोटी काही घटक पक्षांतर करतात. पण त्यांना वाटत असणारे ते यश हे मर्यादित वेळेपर्यंत असते. जनता हे कदापी मान्य करत नाही. पक्षामधून काही लोक गेले तरी त्यामुळे नवीन कार्यकर्त्यांना संधी मिळते.
पक्ष संघटना मजबूत होत जाते. पक्षाला गर्दीपेक्षा विचार मानणारे कार्यकर्त्यांची गरज आहे.
काँग्रेस पक्ष संघटना हा एक विचार आहे, त्याचे अस्तित्व कायम जिवंत ठेवेल. यशापयश निवडणुकीच्या माध्यमातून सुरूच असते; पण येणाऱ्या कालावधीत संघटना अधिक मजबूत केली जाईल. कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देऊन काँग्रेसचा विचार हा जनमानसांपर्यंत पुन्हा रुजविला जाईल. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला निर्विवाद यश निश्चित मिळेल, असा विश्वास माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना विश्वास व्यक्त केला
उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर व महाव्यवस्थापक मदनसिंह परदेशी यांनी श्री. थोरात यांचे स्वागत केले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष आकाश छाजेड, शरद आहेर, ब्रिज दत्त, बबलू खैरे, उद्धव पवार, प्रशांत मारू इत्यादी उपस्थित होते.
श्री. थोरात यांनी काँग्रेसच्या सध्याच्या स्थितीसह विविध राजकीय विषयांवर भाष्य करीत काँग्रेस पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे उभा राहील, असा विश्वास जागविला. श्री. थोरात म्हणाले, पूर्वी निवडणुका विचारांवर व विकासाच्या मुद्द्यांवर लढविल्या जायच्या. सध्याच्या राजकारणाचा खालावलेला दर्जा यापूर्वी महाराष्ट्राने कधीही बघितलेला नव्हता.
Balasaheb Thorat: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा निफाड तालुक्यात नुकसानीचा पाहणी दौरा
जे कोणी कुठल्याही पक्षाचे असो, येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता त्यांना योग्य जागा दाखवेल. ज्या समविचारी पक्षांना लोकशाही व राज्यघटना मान्य आहे, त्यांना बरोबर घेऊन विकासाच्या मुद्द्यावर ताकदीने निवडणुकांना सामोरे जाऊ व प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या जोरावर यश मिळवू.
संकटांना काँग्रेस डगमगलेली नाही
पूर्वी विकासाच्या व विचारांच्या मुद्द्यांवर राजकारण केले जायचे, असे सांगून थोरात म्हणाले, ‘आपला पक्ष, भूमिका, जाहीरनामा, समाजपयोगी केलेली कामे यावर निवडणुका लढविल्या जायच्या. आता मात्र ईडी, सीबीआय अशा केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. पक्ष संघटनांची बँक खाती गोठविणे यास जनतेच्या विकासापेक्षा अधिक प्राधान्य दिले जाते, हे अत्यंत खेदजनक आहे.
काँग्रेस पक्षावर अनेक संकटे यापूर्वीही आलेली आहेत, पण त्यास पक्ष संघटना डगमगून न जाता त्यास आव्हान म्हणून सामोरी गेली आणि त्याप्रसंगी यशही मिळविले. काँग्रेस पक्ष संघटना वाढविताना लाँग टर्म व शॉर्ट टर्म असा प्लॅन करून कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले जाईल. त्यांच्या वैचारिक पातळीमध्ये सकारात्मकता कशी निर्माण होईल, यासाठी विशेष प्रयत्न केले जातील.
शाश्वत विचाराचा काँग्रेस एकमेव
आजही देशात सर्व पक्षांमध्ये शाश्वत विचार असलेला एकमेव काँग्रेस पक्ष आहे. पक्षातून किती लोक गेली व नवीन किती लोक आली, यावर पक्षाचं मूल्यमापन होत नाही. पक्षात आलेला व्यक्ती, तो किती लोकांचे सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी प्रशिक्षित व त्यामध्ये विचार कशाप्रकारे रुजविलेले आहे, हे महत्त्वाचे आहे.
याच दरम्यान ‘खलनायक’ कोण हे जनतेला चांगलंच माहीत आहे निळवंडेच्या मुद्द्यावरुन बाळासाहेब थोरातांनी नाव न घेता विखेंना तुला टोला लगावला.