Saturday, December 21, 2024

महासंस्कृती महोत्सवाला जिल्ह्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दररोज 25 ते 30 हजार लोकांची उपस्थिती

नगर दि.25 फेब्रुवारी 2024

महाराष्ट्र राज्य पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग तसेच जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने 22 ते 25 फेब्रुवारी 2024 दरम्यान नगर येथील सावेडीतील भिस्तबाग महल शेजारील मैदानावर महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला एकूणच जिल्हाभरातून नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून येत असून आज पर्यंत झालेल्या कार्यक्रमा पेक्षा रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहायला मिळत आहे.

जिल्ह्यातून मोठा जनसागर हा महोत्सवासाठी दररोज येत आहे. दररोज सुमारे 25 ते 30 हजार लोक सहभागी होत असून मोठ्या उत्साहात येथील सर्व गोष्टींचा आनंद घेत आहेत. शहरातील नागरिकांसह जिल्ह्यातून नागरिक विविध वाहनातून गटागटाने येत आहेत. तसेच सदरील महोत्सव आयोजित केल्याबद्दल समाधान देखील व्यक्त करीत आहेत. जिल्हा प्रशासनाने कार्यस्थळाचे आणि विविध कार्यक्रमांचे आखीव-रेखीव नियोजन केले असून या सर्व कार्यक्रमांना मोठी गर्दी असली तरी गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे

गुरुवार दि. 22 फेब्रुवारी रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात हा महोत्सवाचे उद्घाटन संपन्न झाले होते. या महोत्सवात जिल्ह्याचे आदर्श ग्रामसेवक आणि आर.आर.(आबा) पाटील सुंदरग्राम योजनेतील ग्रामपंचायतींचा सन्मान सोहळा देखील आयोजित करण्यात आला होता.

स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, विविध कला व संस्कृती यांचे जतन व संवर्धन व्हावे तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात लढवय्यांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी हा उद्देश ‘महासंस्कृती महोत्सव’ आयोजित करण्यामागे आहे.

या महोत्सवात विविध शासकीय विभागांच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल्स, बचतगटांचे स्टॉल, विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, पर्यटन, कृषी तसेच ऐतिहासिक वस्तूंची माहिती देणारे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहे. तब्बल चार दिवस सकाळी 11 ते रात्री 10 या कालावधीत सुरू असणाऱ्या या महोत्सवाला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे या महोत्सवात सर्वांना मोफत प्रवेश आहे. जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रातील नागरिकांची मोठी गर्दी येथे पाहायला मिळत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या