तालुक्यातील पाणी प्रश्नासाठी आम्ही आंदोलन करायचे आणि तुम्ही पाणी आडवणाऱ्या जिल्ह्याला ऊस द्यायचा : राजेंद्र नागवडे
श्रीगोंदा दि.2 नोव्हेंबर 2023
सहकारमहर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखाना २०२२-२३ या वर्षासाठी दिवाळीसाठी ७५ रुपये सभासदांच्या खात्यात वर्ग करणार असून, एकूण २६०० रुपये भाव पूर्ण करणार आहे. तसेच, २०२३ – २४ च्या हंगामात येणाऱ्या उसाला पहिला हप्ता २५०० रुपये देणार असल्याची घोषणा नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केले.
सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचा ४९ वा गळीत हंगामाचा शुभारंभ तालुक्यातील १०९ महिलांच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून झाला. यावेळी नागवडे बोलत होते. जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे, नगराध्यक्षा शुभांगी पोटे, टिळक भोस यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना नागवडे म्हणाले, की आपला सहकार साखर कारखाना शेतकरी सभासदांच्या जीवावर चालला आहे.. सहकार आणि खासगी कारखान्यांमध्ये मोठी स्पर्धा चालू आहे. जिल्ह्यातील उत्तरेत याचे प्रमाण कमी आहे, पण आपल्या भागात याचे लोन जास्त आहे. कारण, ऊसाला कमी जास्त भाव म्हणून शेतकरी आपला चांगला ऊस शेजारील खासगी कारखान्याला देतात,आणि खराब ऊस आपल्या सहकारी कारखान्याला देतात. त्यामुळे ऊसाला सभासदांच्या मनाप्रमाणे भाव देता येत नाही. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाणीप्रश्नासाठी आम्ही आंदोलने करायची अन् तुम्ही पाणी अडवणाऱ्या पुणे जिल्ह्यात ऊस देता, हे योग्य नाही. खासगी कारखाने वेगवेगळी आमिषे दाखवून ऊस नेतील, पण बिलासाठी पुन्हा मागे पळावे लागेल, तसा तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा अनुभव आला असल्याचे ही ते म्हणाले.