अवलिया गणेशभक्त…केली चक्क झाडावर श्रींची प्रतिष्ठापना….
पहिला गणपती पुण्यात बसला असला तरी गणेशोत्सवाची क्रेझ मात्र अगदी खेड्यापाड्यात पहायला मिळते. श्रीगोंदा तालुक्यातील चिखली कोरेगाव येथील सागर थोरात या अवलीयाने एकट्याने आरास करुन झाडावर बसविलेला गणपती पहायला सध्या गर्दी होत आहे.
त्याचबरोबर या अवलियाच्या शेतात गणरायासह छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा शेताच्या बांधावर विराजमान आहेत.
चिखली कोरेगाव या अवघ्या दोन हजार लोकसंख्येच्या गावात थोरात कुटुंबाने हा आगळावेगळा गणेशोत्सव साजरा केला आहे. आपल्या शेतातील रामकाठीवर चक्क सुमारे वीस ते तीस फुट उंचीवर त्यांनी विलोभनिय आरास करत हा गणपती बसवला आहे.
सागर याने गेल्यावर्षीही याच झाडावर गणेशाची प्रतिष्ठापना केली होती. यंदाही झाडावर गणेश स्थापना करत त्याने झाडाच्या बाजूलाच असलेल्या सुमारे 10 गुंठे शेततळ्यावर आकर्षक विद्युत रोषनाई केली आहे. सायंकाळी थोरात कुटुंबाच्या गणपतीला पहायला गावातील गर्दी लोटते.
गणपतीवर फक्त श्रद्धा महत्त्वाची… श्रद्धा असली तर कल्पना सुचतेच हेच या अवलियाने दाखवून दिले आहे. तुम्हालाही या गणेशाचे दर्शन घेण्याची इच्छा असेल तर पहिल्यांदा श्रीगोंद्याला यावे लागेल, तेथून नगर दौंड रस्त्यावर अंदाचे 25 किलोमिटर अंतरावर या गणेशाची सुंदर आरास पहायला मिळेल.