विकासाच्या मुद्द्यावर जनता आमच्या पाठीशी : खा.विखे
कर्जत दि.16 एप्रिल 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात राम मंदिराची उभारणी झाली, त्यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमीपुजन झाले आणि प्राणप्रतिष्ठा सुद्धा त्यांच्याच हस्ते पार पडली. जर पंतप्रधान मोदी नसते तर देशाला राम मंदीराची अजूनही वाट पहावी लागली असती. मोदी नसते तर प्रभू रामचंद्राचे मंदिर झालेच नसते. असे मत अहिल्यानगरचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले. रामनवमी निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
राम नवमीच्या निमित्ताने देशात प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. याच पार्श्वभुमीवर नगर जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गल्लोगल्लीत रामनामाचा जयकारा सुरू होता. खा. डॉ. सजय विखे पाटील हे कर्जत तालुक्यातील भांभोरा येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून त्यांनी प्रभू रामचंद्राचे दर्शन घेऊन त्यांचे आशिर्वाद घेतले. यावेळी त्यांच्या सोबत आमदार राम शिंदे आणि इतर प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रसंगी रामभक्तांना संबोधित करताना खा. विखे म्हणाले की, देशात राममंदिरासाठी ५०० वर्षांचा संघर्ष झाला. या संघर्षात अनेकांचे जीव गेले. मात्र केंद्रात मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत आल्यानंतर राममंदिर पुर्ण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला होता. यासाठी न्यायालयातील लढाई सरकारने यशस्वी केली. यामुळे अयोध्येत राम मंदिर उभे राहण्याचे स्वप्न पूर्णत्वास गेले.
लोकसभा मतदार संघात मागील पाच वर्षात केलेल्या विकासकामांवर आपण नागरिकांकडे समर्थन मागत आहोत. या भागातील प्रश्नांसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून निधीची उपलब्धता केली. आपल्याकडे केलेली विकासकामे सांगण्याचे काम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील १० वर्षात घेतलेल्या निर्णयांचे लोककल्याणकारी योजनांची माहिती आहे. बुथवरील प्रत्येक कार्यकर्त्याने लाभार्थी आणि मदतारांपर्यंत पोहचवायची आहे. नकारात्मक गोष्टीना थारा देऊ नका असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
विरोधी उमेवाराकडे सांगण्यासाठी कोणतेही काम नाही, ते त्यांच्या तालूक्याचा विकास करू शकले नाहीत. लोकसभा मतदार संघाचा विकास कसा करणार? विश्वासघात करून त्यांचे राजकारण सुरू आहे. केवळ दहशत आणि दादागिरी करून सुरू असलेल्या राजकारणाला जनता कधीही स्विकारणार नाही. या भागातील जनता सुज्ञ आणि विचारी आहे. विकासाच्या कामावर शिक्कामोर्तब करून लोकसभा मतदार संघातील जनता महायुतीच्या पाठीशी खंभीर उभी राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.