लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तालुक्यातील शेतकरी पाण्यासाठी आक्रमक
श्रीगोंदा दि.9 एप्रिल 2024
कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांना पाणी देण्याचे ठरले होते. मात्र या बैठकीत ठरल्याप्रमाणे तालुक्यातील फळबागांना पाणी न मिळताच कालवा बंद झालेला असून, शेतकऱ्यांच्या शेतातील 80 टक्के फळबागांना उभ्या पिकांना पाणी मिळालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील फळबागा जळून जाणार असून, शेतकऱ्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान होणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या असलेल्या कुकडी लाभक्षेत्रातील फळबागांचे त्वरित पंचनामे होणे गरजेचे आहे. तसेच शेतकऱ्यांच्या या फळबागा वाचविण्यासाठी कुकडी धरणाचे पाणी तातडीने सोडून, या फळबागा वाचविणे नितांत गरजेचे आहे.
तसेच नेहमी उन्हाळी आवर्तनामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील पिण्याच्या पाण्यासाठी असणारे 83 स्त्रोत भरून घेतले जातात. या आवर्तनात पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोत असणाऱ्या ठिकाणी थेंब रही पाणी देण्यात आलेले नाही. त्यामुळे या तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भविष्यकाळामध्ये अत्यंत गंभीर स्वरूप धारण करणार आहे. त्यामुळे डिंभे धरणातून येडगाव धरणात पाणी घेऊन तसेच पिंपळगाव जोगे यातून येडगाव धरणात पाणी घेऊन कुकडी कालव्याची आवर्तन पूर्ण करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात यावी, अन्यथा या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा घनश्याम आण्णा शेलार यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. सदर निवेदनाच्या प्रत जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता पाटबंधारे विभाग पुणे, कार्यकारी अभियंता कुकडी क्रमांक दोन आदींना पाठवण्यात आले आहेत
यावेळी राजेंद्र म्हस्के, संजय आनंदकर, एम डी शिंदे, अनिल ठवाळ, भाऊसाहेब खेतमाळीस, बापूराव सिदनकर आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.