राहुरी तालुक्यात खासदार सुजय विखे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन
राहुरी दि.26 डिसेंबर 2023
आम्ही साखर वाटप करत असल्यामुळे अनेकांचा पोटसूळ उठला असून स्व. माजी खासदार पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्यापासून आज तिसऱ्या पिढीपर्यंत जनतेची सेवा करत आलो आहोत.
जनतेसाठी जे करता येईल, ते करण्याचा प्रयत्न करत असून सध्या आम्ही साखर वाटपाचा कार्यक्रम सुरू केल्यापासून अनेकांना त्याचा त्रास होत आहे. स्वतःच्या कुटुंबाने आतापर्यंत जनतेला कधीही काही दिलं नाही,
आम्ही देतो तर तुम्हाला वाईट वाटत असेल, तर तुम्ही पण द्या, असा टोला खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांचे नाव न घेता लगावला आहे.
राहुरी तालुक्यातील वांबोरी, उंबरे, कात्रड, गुंजाळे या परिसरामध्ये साखर व दाळ वाटप कार्यक्रमप्रसंगी खासदार डॉ. विखे पाटील बोलत होते. यावेळी माजी मंत्री, जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले,
राहुरी तालुक्याचे ज्येष्ठ नेते सुभाष पाटील, डॉ. तनपुरे कारखान्याचे माजी चेअरमन नामदेवराव ढोकणे, माजी चेअरमन उदयसिंह पाटील, वांबोरीचे सरपंच किरण ससाणे, उंबरेचे सरपंच सुरेश साबळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी खासदार डॉ. विखे म्हणाले की, साखर व डाळ वाटपाचा कार्यक्रम कुठल्याही राजकीय पक्षाचा कार्यक्रम नसून ही साखर व डाळ विखे व कर्डिले यांच्या वतीने आम्ही वाटप करत आहोत. अयोध्येत २२ जानेवारीला राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पूजा करण्यात येणार आहे.
त्यामुळे जनतेने या डाळींचे लाडू करावेत, स्वतः खावेत व प्रसाद म्हणून यातील लाडू वाटावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. अनेक जण सोशल मीडियाद्वारे साखर, डाळ वाटप केल्याबद्दल अफवा पसरत आहेत.
आम्ही कुठलीही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम करणारी मंडळी नाही. अनेक माता भगिनींना पंढरपूर दर्शन घडवून आणले असले तरी हे राजकारणासाठी करत नाही. माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले दिवाळीच्या वेळेला फराळ वाटपाचा कार्यक्रम करतात, त्यांची ही परंपरा आहे.
आत्तापर्यंत लोकप्रतिनिधींनी जनतेसाठी काय केले व जनतेला काय दिले? हे सर्व तालुक्याला माहित आहे. वांबोरी परिसरातील विकासासाठी १३ कोटी रुपयाची कामेही ज्येष्ठ नेते सुभाष पाटील यांच्या मागणीनुसार सुरू आहेत. विकास कामात कुठेही आम्ही मागे राहणार नाही.
यावेळी जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांनी अडीच वर्षे तनपुरे मंत्री असताना काही करू शकले नाही, परंतु मंत्री विखेंनी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिल्याचे सांगितले.
यावेळी शामराव पटारे, सारंगधर पटारे, भाऊराव ढोकणे, बाबुराव ढोकणे, बाबासाहेब दारकुंडे, एकनाथ दुशिंग, रामदास आडसुरे, सिताराम ढोकणे, ज्ञानदेव क्षीरसागर, संजय आडसुरे, विलास गुंजाळ, ज्ञानेश्वर विखे, मनोज गव्हाणे, राजेंद्र पटारे आदी ग्रामस्थ महिला उपस्थित होते.